आषाढी एकादशीसाठी विक्रमी भाविक होणार पंढरपूरमध्ये दाखल

0

पंढरपूर : आषाढी एकादशीला अवघा एक दिवस शिल्लक आहे. पंढरपूरच्याजवळ येताच वारकऱ्यांना विठुरायाच्या भेटीची आस लागते आणि त्यांची पावलं पंढरपूरकडे ओढली जातात. आज शनिवारी पालखी पंढरपूरात दाखल होणार आहेत.

आषाढी यात्रेसाठी पंढरी सजली असून आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच पंढरपूरात आगमन होणार आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर पायी चालत वारकरी पंढरपूरात येत आहेत. त्यामुळे वारकरी आनंदले आहेत.

दोन वर्षांनंतर होत असलेल्या आषाढी यात्रेला काल नवमीपर्यंत 7 लाखांहून अधिक भाविक दाखल झाले होते. एवढ्या मोठ्या संख्येने पोहचलेल्या भाविकांच्या निवासाचा प्रश्न कायमच गंभीर असतो. मात्र काही वर्षांपासून प्रशासनाने चंद्रभागेशेजारी असलेल्या 65 एकर जागेवर भक्तिसागर हे निवास क्षेत्र बांधले आहे. यंदा रेल्वेच्या ताब्यात असलेल्या 40 एकराचे क्षेत्र देखील प्रशासनाला मिळाल्याने यंदा 105 एकर जागेत पाच लाख भाविकांच्या मोफत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत 4 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले असून वाटून दिलेल्या प्लॅटवर त्यांनी आपले तंबू उभारले आहेत.

या ठिकाणी पिण्याचे आणि वापराचे शुध्द पाणी, आरोग्य व्यवस्था, स्वच्छतागृहे, वीज, डांबरी रस्ते आणि सुरक्षेसाठी पोलिसांची व्यवस्था केल्याने यंदा प्रथमच पाच लाखांपेक्षा अधिक भाविकांना येथे निवासाची सोय झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.