ठाणे : उल्हासनगर नेहरु चौक परिसरातील साई शक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर ठाणे इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पुनीत बजोमल चांदवाणी (वय 17 वर्ष), दिनेश बजोमल चांदवाणी (वय 40 वर्ष), दीपक बजोमल चांदवाणी (वय 42 वर्ष), मोहिनी बजोमल चांदवाणी (वय 65 वर्ष), कृष्णा इनूचंद बजाज (वय 24 वर्ष), अमृता इनूचंद बजाज (वय 54 वर्ष) आणि लवली बजाज (वय 20 वर्ष)
यांचा मृत्यू झाला आहे तर एलगोज नायडर (वय 60 वर्ष)
हे जखमी आहेत.
उल्हासनगरमध्ये शुक्रवारी (29 मे) रात्री दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमधील चार जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर केली. तसंच अशा धोकादायक पद्धतीने उभारण्यात आलेल्या इमारतीच्या बिल्डरविरोधात कारवाई करण्याचा सूचना पालिका आयुक्तांना दिल्या आहे. परंतु या घटनामुळे उल्हासनगरमधील धोकादायक, अतिधोकादयक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या इमारतीमध्ये एकूण 29 फ्लॅट होते. स्लॅब कोसळल्यानंतर जोरदार आवाज झाला, त्यामुळे काही रहिवाशांनी बाहेर पळ काढला तर काहींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यापाठोपाठ मदतीसाठी ठाणे महानगरपालिकेची TDRF टीम देखील घटनास्थळी दाखल झाली. या पथकांनी ढिगारा बाजूला करुन सात मृतदेह बाहेर काढले.