सोलापूर : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एका शेतकऱ्याने घेतलेले डाळिंबाचे उत्पादन यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम व दर्जेदार उत्पादन ठरले आहे. त्यांनी पिकविलेल्या डाळिंबाला किलोमागे चक्क ५०१ रूपये दर मिळाला आहे. मागील चार दिवस तालुक्यासह आसपासच्या तालुक्यांमध्ये याची जोरात चर्चा झाली. मात्र, यामागे नेमके काय कष्ट आहेत, हे सांगताना या शेतकऱ्याने त्याचे श्रेय चराचरातून वाहणाऱ्या चैतन्यशक्तीला दिले आहे!! त्यांनी अभ्यासपूर्वक शेतीचा हा अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे.
आटपाडीतील आठवडे बाजारात रविवारी (३ जानेवारी) खुले लिलाव झाले. त्यामध्ये संदीप हिंदुराव देशमुख यांनी डाळिंब विक्रीसाठी आणले होते. यावेळी पंढरीनाथ नागणे यांच्या मंगलमूर्ती फ्रुट सप्लायरच्या माध्यमातून तासगावातील वसंत खराडे या व्यापाऱ्याने ५०१ रूपये प्रतिकिलो भाव देउन हे डाळिंब खरेदी केले. तालुक्यातील डाळिंबाच्या बागांना यंदा अतिवृष्टीचा फटका बसला. त्यामुळे डाळिंबाचे उत्पादन घटले. असे असले तरी, संदीप देशमुख यांनी घेतलेले पीक अतिशय दर्जेदार ठरले. त्यामागे नेमके काय कारण आहे, असे विचारले असता हा खरोखरच चैतन्यशक्तीचा परिणाम असल्याचे ते सांगतात. सेंद्रीय शेतीला या विज्ञानाधारित पद्धतीची जोड दिल्यास कोणतेही पीक अतिशय दर्जेदार येते.
चैतन्यशक्तीची शेती नेमकी कशी असते याविषयी ते म्हणाले, मनुष्याच्या शरीरात माकडहाडाच्या तळाशी कुंडलिनी नावाची एक सुप्त शक्ती असते. ती माकडहाडातून शरीराच्या मध्यनाडीद्वारे टाळूतून बाहेर पडते, त्यावेळी दोन्ही तळहातावर चराचरात वाहणाऱ्या चैतन्यशक्तीचा अनुभव येतो. हे चैतन्य पीकलागवडीवेळी बियाणांना दिल्यास येणारे पीकही जोमदार येते. तसेच पाणी देताना, खते तयार करतानाही या चैतन्यशक्तीचा उपयोग होतो. श्रीमाताजी निर्मलादेवी यांनी ही ध्यानपद्धती विकसित केली आहे. यासंदर्भात, राहुरीच्या कृषी विद्यापीठात अनेक प्रयोग यशस्वी झाले आहेत. उस, सूर्यफूल या पिकांवरही हे प्रयोग यशस्वी झाले आहेत. याबाबत सविस्तर माहितीसाठी आपण ‘सहज कृषी अभियान’ हे ॲप (https://play.google.com/store/apps/details?id=com.greeneyemedia.sahajakrishiabhiyan) डाउनलोड करून माहिती घेउ शकता