प्रेम प्रकरणातून व्यापाऱ्याचे अपहरण; आरोपीला अटक

0

पुणे : मांजरी येथील व्यापा-याचे अपहरण करणा-या आरोपीस हडपसर पोलिसांनी पाली (राजस्थान) येथून अटक केली आहे. प्रेमप्रकरणातून ही घटना घडली असून, याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

दिनांक २३/११/२०२२ रोजी रात्री १०.५० वा सुमारास ओमाराम दुर्गाराम कच्छावाह (वय २८ वर्ष रा. मांजरी पुणे) यांनी पुणे शहर कंट्रोल रूम येथे फोन करून ललीत चौधरी याचे अपहरण करून त्यास चारचाकी गाडीमध्ये घेवून गेले बाबत सांगीतले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तात्काळ घटनास्थळी पोलिस उप आयुक्त विक्रांत देशमुख, परीमंडळ ०५, पोलिस उप-आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहा. पोलिस आयुक्त हडपसर विभाग बजरंग देसाई, हडपसर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकूळे, तपास पथकातील सपोनि विजयकुमार शिंदे, पोउनि अविनाश शिंदे भेट दिली. याबाबत हडपसर पोलिस ठाणेस गु.र.नं १४७८ / २०२२ भा.दं. वि. कलम ३६५,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

दुकानामध्ये असणारे सीसीटीव्ही तसेच दुकानाच्या बाहेरील बाजूस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करता, अपहृत व्यक्ती ललीत चौधरी याचे हरीओम व्हरायटीज नावाचे दुकानामध्ये रात्री १०.५० चे सुमारास असताना, तीन जणांनी येवून दुकानात खरेदी करण्याचा बहाणा करून दुकानामध्ये बराचवेळ थांबून राहीले असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी ललीत चौधरी यास मारहाण करीत जबरदस्तीने गाडी मध्ये बसवून घेवून गेले असल्याचे दिसून आले. पोलिसांनी अपहृत व्यक्ती यास फोन केला असता तो बंद होता.

दिनांक २४/११/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वा. चे सुमारास अपहृत व्यक्ती ललीत चौधरी याने घरातल्या मोबाईल वर फोन करून तो वसई विरार टोल नाका येथे असल्याचे सांगितले. शिवाय, त्याने अपहरण करणा-या व्यक्तींकडून सुटका करून घेतली असून सुखरूप असलेबाबत कळवून पुण्याला येत असलेबाबत सांगीतले. अपहृत व्यक्ती ललीत चौधरी हे पुण्यात सकाळी आल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता अनोळखी आरोपींनी अपहरण करून त्यांना गाडीच्या सीटच्या मध्ये पाडून घेवून गेले असल्याबाबत सांगीतले. अपहत व्यक्ती ललीत चौधरी व त्याचे नातेवाईक तसेच मांजरी येथील व्यापारी यांचेकडे गुन्हायाचे अनुषंगाने बारकाईने चौकशी केली असता अनोळखी आरोपींपैकी एक कैलास (रा. पाली राजस्थान) नावाचा संशयीत असलेबाबत समजले. हडपसर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये आरोपी हे राजस्थान कडे जात असल्याचे निष्पन्न झाले.

वरीष्ठांच्या परवानगीने तपासपथकाचे अंमलदार सुशील लोणकर, अतुल पंधरकर, प्रशांत टोणपे, भगवान हंबर्डे यांना तात्काळ राजस्थान येथे आरोपीचे मागे रवाना करण्यात आले. तसेच तपास पथकामधील सपोनि विजयकुमार शिंदे, पोउपनि अविनाश शिंदे व पोना. संदीप राठोड यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपींबाबत उपयुक्त माहिती तपास टिम ला देवून त्याआधारे आरोपी १) कैलासराम सोहनलाल जाट (वय ३५ वर्ष रा. जाटोंकाबास ता. रोहट जिल्हा पाली राज्य राजस्थान) यास शिताफीने ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याची दिनांक ०५/१२/२०२२ रोजी पर्यंत ०७ दिवस पोलिस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.

आरोपी कैलासराम जाट याचेकडे केले तपासात त्याने सांगीतले की, अपहृत ललीत चौधरी याचे त्याच्या आत्याच्या मुलीबरोबर प्रेम संबंध असल्याने त्याने त्याचे फरारी साथीदार २) तिकाराम खोत ३) भंवर जाखड ४) गोवींद (सर्व रा. जालोर राजस्थान) यांच्यासह अपहरणाचा कट रचला होता. आरोपी कैलासराम जाट व त्याचे साथीदार हे केरळ येथून पुण्याकडे निघून ललीत चौधरी याचे अपहरण करून त्यास बोलेरो गाडी मध्ये घेवून जावून जिवे ठार मारण्याची धमकी देवून वसई विरार टोलनाका जवळील जगंलामध्ये सोडून राजस्थान कडे निघून गेले असल्याचे सांगीतले. गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि विजयकुमार शिंदे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही नामदेव चव्हाण, अप्पर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व विक्रांत देशमुख, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर यांचे मागदर्शनाखाली बजरंग देसाई, सहाय्यक पोलिस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर पोलिस स्टेशन, पुणे शहर, दिगंबर शिंदे साो, पोनि (गुन्हे) विश्वास डगळे, पोनि. (गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलिस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलिस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.