पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागातील दोन कर्मचा-यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. महापालिका पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात लाच स्वीकारण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातच स्थायी समिती सभापतीवरील कारवाईनंतर ही दुसरी कारवाई झाल्याने सत्ताधा-यांसह पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव कर संकलन कार्यालयात दोन कर्मचा-यांवर ‘एसीबी’ने आज धाड टाकली आहे. त्यामध्ये एक मुख्य लिपीक आणि दुसरा लिपीक यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. एकाने तीन हजार आणि दुस-याने पाच हजाराची लाच घेतल्याचे सांगण्यात येत आहे. लिपिक प्रदीप शांताराम कोठावडे आणि मुख्य लिपिक हायबती मोरे या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे थेरगाव येथील कर संकलन कार्यालयात कार्यरत आहेत. आज पावनेसहा वाजता कार्यालय बंद करण्यापूर्वी ही कारवाई झाली आहे. या कारवाईने पालिका प्रशासन चांगलेच हडबडले आहे.
दरम्यान, महापालिकेच्या कामाचे टेंडर मंजूर झाल्यानंतर वर्क ऑर्डरसाठी एका ठेकेदाराकडे स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने दहा लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा लावून कारवाई करत अॅड. नितीन लांडगे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे, लिपिक विजय शंभुलाल चावरिया, शिपाई अरविंद भीमराव कांबळे, संगणक चालक राजेंद्र जयवंतराव शिंदे यांना अटक केली होती. ही कारवाई 18 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. या कारवाईनंतर ही दुसरी कारवाई करण्यात आली आहे.