मुंबई : मुंबई ड्रग्ज प्रकरणातून नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वादंग पेटले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे दिवाळीनंतर उघड करणार असल्याचा इशारा दिला आहे. यावर फडणवीसांनी दिलेले हे आव्हान मलिकांनी काही मिनिटांतच स्वीकारले असल्याचे ट्विट केले आहे.
फडणवीसांच्या आशीर्वादाने ड्रग्जचा खेळ सुरु असल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केला. यावरुन आता राजकारण चांगलंच तापलं आहे. फडणवीसांनी मलिकांच्या आरोपांचे खंडन केलं आहे. फडणवीस माध्यमांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, दिवाळीची सुरवात मलिकांनी लवंगी फटाक्यांनी केली आहे. पण दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार आहे. मी काचेच्या घराच राहत नाही. दिवाळी संपण्याची वाट पाहा. अंडरवर्ल्डशीसोबत मलिकांचे असलेल्या संबधांचे पुरावे मी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार आहे. मलिक यांनी आज टि्वट केलेला फोटो चार वर्षापूर्वीचा आहे. त्याचे माझ्यासोबतही फोटो आहेत, पण त्यांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो टि्वट केला आहे. मलिक यांच्या जावायाकडे ड्रग्ज सापडले, तर सर्वच राष्ट्रवादी ड्रग्ज माफीया आहे का?