खून झालेल्या तरुणाची ओळख पटण्यापूर्वी आरोपी अटकेत

0

पिंपरी : अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाला खून केल्याच्या आरोपात अटक केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रकरणी आरोपी निलेश धुमाळ याला अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 15 जुलै रोजी सायंकाळी माण रोडकडून म्हाळुंगे गावाकडे जाणाऱ्या रोडच्या डाव्या बाजूस कठड्याजवळ कचऱ्याच्या ढिघाऱ्यावर रोहन बिल्डर यांच्या जागेवर हिंजवडी गावात एका अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला होता. त्याचा चेहरा व तोंड छिन्नविछिन्न अवस्थेत होते. तसेच मान उजव्या बाजूकडून पाठीमागे तुटलेली, डावा हात दंडापासून नव्हता, उजव्या पायाच्या नडगीवर आणि पाठीवर मोठ्या प्रमाणात जखम होती. तसेच, त्याच्या अंगावर व उजव्या हाताच्या दंडावर गोंदल्याच्या अस्पष्ट खुणा होत्या.

ससून हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोस्टमार्टम करुन मयताच्या मरणाचे कारण ‘dearh due to multiple injuries in case of assault’ असे  दिले. त्याप्रमाणे रवींद्र मुदळ (पोलीस उप निरीक्षक, हिंजवडी पोलीस ठाणे) यांनी सरकारतर्फे लेखी फिर्याद दिल्याने भा. द. वि. कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक गुन्हे सोन्या बापू देशमुख, पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल दहिफळे यांनी दिलेल्या सुचनेनुसार अनोळखी मृतदेहाची ओळख व त्याचा खून करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे, व सहाय्यक पोलीस निरीक्षक गोमारे यांच्यासोबत अंमलदार अशा दोन तपास टीम नेमण्यात आल्या.

तपासात निष्पन्न झाले, की आरोपी निलेश धुमाळ व मयत हे दारू पिण्यासाठी अशोक कंट्रीबारच्या पाठीमागील बाजूस बसले होते. दारू पित असताना मयताकडून धुमाळचा दारूचा ग्लास सांडला. यामुळे धुमाळने काठीने व दारूच्या बाटलीने तोंडावर व डोक्यावर तसेच शरीराच्या इतर भागावर मारहाण करून जखमी करून ठार मारले.  त्यानंतर तो तेथून पळून गेला. मयत हा फिरस्ता असून त्याचे नाव बालाजी असून तो नांदेडचा राहणारा होता. एवढीच त्याची ओळख पटली आहे. तो झाडू मारण्याचे काम करत होता.

घटनास्थळाच्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, त्यात एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी जाताना दिसली होती. त्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे व गोमारे आणि त्यांच्या डी.बी स्टाफने त्या गाडीचा नंबर शोधून काढला. त्यानंतर तपासात निष्पन्न झाले, की मृतदेह हे ड्रायव्हर राजेंद्र थोरात व कंट्री बार येथे कामाला असणारा पाहिजे. आरोपी अखिल व धर्मेंद्र यांनी गाडीत कचऱ्यासोबत भरून माण म्हाळुंगे रोडला कचऱ्याच्या धिगाऱ्यात टाकून दिले होते. त्याप्रमाणे आरोपींनी पुरावा नष्ट केल्याबाबत गुन्ह्यामध्ये भा. द. वि. कलम 201, 34 हे कलम वाढ करण्यात आली आहे. मयताची पूर्ण ओळख पटवण्याबाबत तपास चालू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.