पुणे : पुणे सायबर पोलिसांनी ‘म्हाडा’च्या पूर्व परीक्षेचा पेपर फोडणाऱ्यांवर कारवाई केली आहे. सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यामध्ये ज्या कंपनीमार्फत ही लेखी परीक्षा घेण्यात येणार होती त्या GA Software Technologies Pvt Ltd. कंपनीच्या संचालकाचा समावेश आहे. आरोपींना आज (रविवार) शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 18 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. प्रितिश दिलीपराव देशमुख (32 रा. महिंद्रा अॅन्थीया, खराळवाडी, पिंपरी-चिंचवड-Pimpri-Chinchwad पुणे), संतोष लक्ष्मण हरकळ (42 रा. मिलिनियम पार्क, एमआयडीसी, चिखलठाणा, औरंगाबाद) आणि अंकुश रामभाऊ हरकळ (44 रा. किनगांवराजा, ता. सिंदखेडराजा बुलढाणा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सायबर पोलीस आरोग्य विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या पदांच्या परीक्षांच्या पेपर फुटीचा तपास करत असताना रविवारी (दि. 12) होणाऱ्या ‘म्हाडा’च्या परीक्षेचे पेपर फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथके तयार करुन औरंगाबाद, जालना, बीड, मुंबई, पुणे, ठाणे येथून संशयितांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरु करण्यात आली.
दरम्यान, औरंगाबाद येथील संशयितांसोबत संपर्क साधून त्यांच्याकडून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी परीक्षेच्या पूर्वी पेपर फोडून देण्याची योजना टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचा संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचे संचालक कृष्णा जाधव आणि इतरांनी आखल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच सध्या पुण्यात राहणारे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांनी ‘म्हाडा’च्या परीक्षेला बसलेल्या परिक्षार्थींना पेपर देण्याची तयारी दर्शवल्याचे पोलिसांना समजले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टार्गेट करिअर पॉईंट संस्थेचा संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचा संचालक कृष्णा जाधव आणि त्यांचा साथिदार अंकित चनखोरे यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ‘म्हाडा’च्या परीक्षासाठी बसणाऱ्या तीन परिक्षार्थींचे प्रवेश पत्र, त्यांची मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र, कोरे धनादेश, आरोग्य विभागाच्या ‘क’ वर्गासाठी बसलेल्या 16 आणि ‘ड’ वर्गासाठी बसलेल्या 35 परीक्षार्थींच्या नावाची यादी आणि प्रवेश पत्रांच्या प्रति मिळाल्याने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली.
तर पुणे आणि ठाणे येथील पथकांनी संशयित संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांच्यावर पाळत ठेवून त्यांना क्रेटा (एमएच 20 ई एल 7111) या गाडीतून ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्यासोबत डॉ. प्रितीश देशमुख हा देखील होता. प्रितीश देशमुख हा G.A. Software या कंपनीचा संचालक असून या कंपनीमार्फत ‘म्हाडा’च्या लेखी परीक्षा घेण्यात येणार होत्या. प्रितीश याची झडती घेतली असता त्याच्याजवळ असलेल्या लॅपटॉपमध्ये ‘म्हाडा’च्या लेखी परीक्षेचे पेपर तसेच लिफाफ्यामध्ये पेन ड्राईव्ह आढळून आला. त्यामध्ये ‘म्हाडा’च्या लेखी परीक्षेचे पेपरसेट होते.
संशयित संतोष आणि अंकुश हरकळ यांची झडती घेतली असता त्यांच्या मोबाईलमध्ये ‘म्हाडा’च्या लेखी परीक्षेसंदर्भात संशयास्पद संभाषण आणि परीक्षार्थींचे प्रवेश पत्र तसेच आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या संदर्भातील याद्या आढळून आल्या. या सर्वांवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे , उपायुक्त भाग्यश्री नवटके,
सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार घाडगे,
पोलीस निरीक्षक मीनल पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण करीत आहेत.
संशयित आरोपी डॉ. प्रितीश देशमुख याच्या वतीने अॅड. विजय ठोंबरे यांनी कामकाज पाहिले तर अंकुश आणि संतोष हरकळ यांच्या वतीने अॅड. ऋषीकेश सुभेदार, अॅड. प्रसाद निकम आणि अॅड. तन्मय देव यांनी कामकाज पाहिले.