पुणे : तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणातील आरोपीस न्यायालयाने ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला.
श्रीकांत साठे असे जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आणखी चार जणांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अझान अन्सारी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अन्सारी हे 8 जुलैपासून घरी आला नसल्याची तक्रार त्यांच्या आर्इने तक्रार वानवडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. त्यानंतर नियंत्रण कक्षातील पोलीस कर्मचा-याला लक्ष्मीपार्क महम्मदवाडी भागातील टेकडीवर एका व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचा फोन आला. ही माहिती त्यांनी वानवडी पोलिसांना कळवली.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अझान याने आरोपींच्या अवैध दारूविक्री धंदा आणि गुटखा विक्री संदर्भात पोलिसांना माहिती दिल्याचे समोर आले आहे. त्याचा राग मनात धरून आरोपींनी अझान याला लक्ष्मीपार्क जवळील टेकडीवर नेत त्याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात जामीन मिळण्यासाठी त्याने ॲड. अक्षय बडवे यांच्यामार्फत अर्ज केला होता.
साठे याचा देखील या गुन्ह्यात सहभाग आहे. आरोपी यावर गंभीर स्वरूपाचा दोषारोप असून, प्रथमदर्शनी पुरावा उपलब्ध आहे. त्यामुळे त्यास जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. मात्र हा आरोपी फक्त २० वर्षांचा असून, त्यावर आधीचे कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. दोषारोपपत्र नुसार आरोपीकडून मयत व्यक्तीचा जप्त केलेला मोबाईल वगळता इतर कुठलाही पुरावा नाही.ती जप्त देखील साशंक आहे, असा युक्तिवाद ॲड. अक्षय बडवे यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.