पिंपरी : पुणे सत्र न्यायालयानं एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. छेडछाड आणि विनयभंग प्रकरणी आरोपीला 72 तासांत दोषी ठरवून 18 महिन्यांची सक्त मजुरीची आणि नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा ही सुनावली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक करुन 36 तासांत चार्ज शीट दाखल केल्याने आणि न्यायाधीश श्रद्धा डोलारे यांनी सलग तीन दिवस सुनावणी घेतल्यानं हा ऐतिहासिक निकाल लागला आहे.
आरोपी हॉटेल व्यावसायिक समीर श्रीरंग जाधवला 18 महिने सक्त मजुरीची आणि नऊ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीनं पीडित महिलेच्या घरात शिरला आणि तिच्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. दरम्यान, पीडिता प्रतिसाद देत नसल्यानं आरोपीनं तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी याप्रकरणी 25 जानेवारीच्या सायंकाळी पाच वाजता आरोपीविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र मुदळ यांच्याकडे सोपवला. तपास सूत्र हाती घेताच पीएसआय मुदळ यांनी आरोपीचा शोध सुरू केला. दुसरीकडे सबळ पुरावे आणि साक्षीदारांची जुळवाजुळव करून चार्ज शीट तयार ठेवली.
27 जानेवारीला सकाळी साडे नऊ वाजता आरोपी समीरला अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायाधीश श्रद्धा डोलारे यांच्या समोर सुनावणी सुरू झाली. पीडितेची बाजू सरकारी वकील विजयसिंह जाधवांनी मांडली. पहिल्याच दिवशी पीडित महिला, 7 वर्षाच्या मुलासह पाच साक्षीदार, पंच आणि तपास अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला गेला. उलट तपासणी देखील झाली. चार तासांच्या या सुनावणीनंतर 28 जानेवारीला आरोपीचा जवाब नोंदविण्यात आला. मग दोन्ही पक्षांचा युक्तिवाद झाला आणि 29 जानेवारीला न्यायाधीश श्रद्धा डोलारे यांनी अवघ्या 36 तासांत केस निकाली काढली. न्यायाधीशांनी आरोपीला कलम 354 अन्वये 6 महिने, कलम 452 अन्वये 6 महिने, कलम 506 अन्वये 6 महिने अशी सक्त मजुरी आणि नऊ हजारांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास पुन्हा एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली.