पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा तीन ठिकाणी हवेत गोळीबार केल्याची घटना काल (मंगळवार)घडली होती. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पिंपरी- चिंचवडमध्ये वेगवेगळ्या तीन ठिकाणी हवेत गोळीबाराच्या घटनेने शहर हादरले होते. मात्र, अवघ्या काही तांसातच आरोपींना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पिंपरी- चिंचवड आयुक्तालयातील पोलिस अतिसक्षम आहेत. त्यांचा नेहमीच दरारा राहील असे सांगत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तपास करणाऱ्या आधिकाऱ्यांची पाठ थोपटली. शहरातील गुन्हेगारी गेल्या तीन वर्षांची आकडेवारी पाहता कमीच आहे असेही ते म्हणाले.
शाहरुख शहानवाज शेख, फारुख शहानवाज शेख, शोएब शेख आणि शोएब अलवी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे. त्यांना गुंडा विरोधी पथक, दरोडा विरोधी पथकाने गजाआड केलं. किरकोळ कारणावरून आरोपींनी हवेत गोळीबार केल्याचे उघड झाले आहे. दोन पिस्तूलातून हवेत चार गोळ्या झाडल्याच पोलीस आयुक्तांनी सांगितलं.
सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अज्ञात चार जणांच्या टोळक्याने रिक्षातून येऊन पत्राशेड येथील दुकानदाराला दमदाटी आणि मारहाण करून सीसीटीव्ही कॅमेरा बंद करायला लावला. तेथील लोकांना दमदाटी करत भर वस्तीत पिस्तूलातून हवेत गोळ्या झाडल्या. पुढे शंभर मीटरवर म्हणजे भाट नगर आणि बौद्ध नगर येथे देखील जाऊन दोन पिस्तूलातून पुन्हा हवेत गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळं नागरिकांमध्ये भीती होती. घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले, स्वतः पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी भेट देऊन तात्काळ आरोपींना शोधण्याचे आदेश दिले. अवघ्या चार तासातच आरोपीला गुंडा विरोधी पथक आणि दरोडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत आज पोलीस आयुक्तालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. तिथं आयुक्त अंकुश शिंदेंनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. गुन्हेगारी वाढली आहे का? या प्रश्नावर त्यांनी उत्तर देत, गेल्या तीन वर्षातील गुन्हेगारी ची आकडेवारी पाहता गुन्हेगारी वाढली नसल्याच त्यांनी स्पष्ट केले. पिंपरी- चिंचवड शहरातील अतिसक्षम अशी पोलिस यंत्रणा आहे. पिंपरी- चिंचवड पोलिसांचा दरारा नेहमीच वाढलेला असेल. अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.