पिंपरी : विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक करुन दोषारोपपत्रासह न्यायालयात तत्काळ हजर केले. न्यायालयानेही अवघ्या 36 तासांमध्ये आरोपीला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. एवढ्या झटपट पद्धतीने न्याय मिळण्याची शहरातील ही पहिलीच घटना आहे. पोलीस आणि न्यायालयाच्या या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
सुरेशकुमार मोहनलाल (22, रा. मोरया हौसिंग सोसायटी, वेताळनगर, चिंचवड) असे सहा महिन्यांची शिक्षा लागलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास पीडित महिला घरात एकटी असताना आरोपी तिथे आला आणि तिचा विनयभंग केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला अटक केली. तसेच दुसरीकडे तातडीने विनयभंगाच्या गुन्ह्यातील दोषारोपपत्र तयार केले.
आरोपीला दोषारोपपत्रासह न्यायालयात हजर केले. सरकारच्या वतीने ऍड. साधना बोरकर यांनी युक्तीवाद केला. पोलिसांनीही पुराव्याची भक्कम भिंत उभी केली. अवघ्या 36 तासांमध्ये न्यायालयाने आरोपी सुरेशकुमार मोहनलाल याला विनयभंगाच्या गुन्ह्यात सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची रवानगी तुरूंगात केली आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, सहायक आयुक्त डॉ. सागर कवडे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक कृष्णदेव खराडे, निरीक्षक (गुन्हे), किशोर पाटील, उपनिरीक्षक विकास मडके, पोलीस नाईक सचिन सोनपेटे, न्यायालयीन पोलीस कर्मचारी सुरेश केदारी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
आरोपींच्या मनात जरब निर्माण होईल – ॲड. साधना बोरकर
महिला अत्याचाराबाबतचे गुन्हे जलदगती न्यायालयात चालवावे, असा कायदा आहे. जर अवघ्या दोन दिवसांत आरोपीला शिक्षा होणार असेल तर असे गुन्हे करताना आरोपींच्या मनात कायद्याचा धाक राहिल. तसेच न्याय मिळविण्यासाठी आपल्याला न्यायालयात वारंवार चकरा माराव्या लागणार नाही, असा विश्वास महिलांच्या मनात निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया सरकारी वकील अॅड. साधना बोरकर यांनी दिली.