पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरून वस्ताराने गळ्यावर वार करणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. सत्र न्यायाधीश एस.एच.ग्वालानी यांनी हा निकाल दिला.
राजू विक्रम मानवतकर (वय ३२, रा. कोथरूड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ही घटना २७ जानेवारी २०१८ रोजी रात्री एकच्या सुमारास वडगावशेरी भागात घडली होती. याबाबत प्रशांत सुरेश जगधने (वय २३, रा. वडगावशेरी) याने फिर्याद दिली होती. मानवतकर याने घरासमोर उभ्या असलेल्या फिर्यादींना शिवीगाळ केली. त्यानंतर एका महिलेशी अनैतिक शरिरसंबंध का ठेवतो, असे म्हणत वस्तराने वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
आरोपीने खूनाचा प्रयत्न केला या कलमानुसार चंदननगर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र, न्यायालयाने कलम ३२३ (गंभीर मारहाण) नुसार शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. या खटल्याचे कामकाज सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे-पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एस. व्ही. चांदणे यांनी मदत केली.