‘इंद्रायणी’तून वाळू उपसा करणाऱ्या माफियांवर कारवाई; तब्बल सव्वा कोटीचा ऐवज जप्त
पोलीस आयुक्तांची गोफणीय माहिती; 13 जण ताब्यात, मुख्य सूत्रधार फरार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चऱ्होली गावच्या वेशीवर असणाऱ्या इंद्रायणी नदी पत्रातून राजरोसपणे अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या ठिकाणी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेऊन सुमारे 1 कोटी 31 लाख 28 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
केतन रामदास कोलते, योगेश सुरेश वाळुंज, संदेश नंदकुमार कारले, दीपक भाऊसो येळे, अजहर मजहर शेख, अंकुश अजयराम कुमार, अतुल बाबाजी येळे, अर्जुन जीवन चव्हाण, सोमल मौलानी पठाण, सुधीर बाळू राठोड, विलास सुद्राम येळे, सारीक आरिफ पठाण, रवीकुमार श्रीराम धारीराम या सर्व वाहन चालक, कर्मचारी यांना ताब्यात घेतले आहे. तर केतन कोलते , सतीश लांडगे आणि अजय हे मुख्य सूत्रधार असून सतीश आणि अजय फरार आहेत.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार; इंद्रायणी नदी पात्रातून वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाली. यानुसार गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त प्रशांत अमृतकर यांना याबाबत कारवाईचे आदेश दिले. अमृतकर यांनी दरोडा पथकाचे वरिष्ठ निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक प्रशांत महाले, उपनिरीक्षक शाकिर जीनेडी, अंमलदार महेश खांडे, औदुंबर रोंगे, उमेश पुलगम, नितीन लोखंडे, आशिष बनकर, प्रवीण माने, गणेश कोकणे, संदीप पाटील, विजय नलगे, गणेश गिरीगोसावी, प्रदीप शेलार यांच्या पथकाने सापळा रचला.
शुक्रवारी मध्यरात्री चऱ्होली गावच्या हद्दीत नदी पात्रातून वाळू उपसा करताना वाहने आढळून आली. यामध्ये 2 पोकलेन, 4 ट्रॅक्तर, ट्रॉली, 14 ब्रास वाळू, 1 दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या पथकाकडून केला जाणार आहे. यामध्ये कोणतेही आरोपी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड शहरात वाळू माफियांवर कारवाईची पहिलीच वेळ आहे. या कारवाई मुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. तसेच अश्या प्रकारे अवैध धंदे सुरु असल्यास पोलिसांना माहिती द्यावी, त्यावर नक्की कारवाई होईल असे आवाहन करण्यात आले आहे.