पुणे : एका कारच्या झालेल्या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी, येरवडा पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचारी यांनी 20 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तडजोडीअंती 13 हजार रुपये लाच घेताना त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली.
पोलिस हवालदार राजेंद्र दीक्षित यांना याप्रकरणी अटक केली आहे. त्यांच्यासह पोलिस हवालदार जयराम सावलकर, पोलिस हवालदार विनायक मुधोळकर यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत 24 वर्षीय तरुणाने एसीबीकडे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी विरोधात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून तक्रारदार यांचे कारच्या झालेल्या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी ते येरवडा पोलिस ठाण्यात गेले होते. त्यावेळी पोलिस हवालदार जयराम सावळकर, पोलिस हवालदार विनायक मुधोळकर, पोलिस हवालदार राजेंद्र दीक्षित यांनी तक्रारदारांकडे सुरूवातीला 20 हजार आणि नंतर 13 हजार रुपयांची लाच मागणी करून ती लाच रक्कम हवालदार राजेंद्र दीक्षित यांनी येरवडा पोलिस ठाण्यात स्वीकारताना त्यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. येरवडा पोलिस ठाणे येथे याबाबत आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक शीतल जानवे, पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस निरीक्षक भारत साळुंखे, पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, एएसआय मुकुंद आयाचीत, पोलिस शिपाई भूषण ठाकूर,चालक पो शि पांडुरंग माळी यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.