पुणे : आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बराटे टोळीवर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आलेली आहे. दोन पत्रकारांसह14 जणांवर मोक्काची कारवाई केली आहे.
टोळीप्रमुख रवींद्र लक्ष्मण बराटे (रा. बिबवेवाडी), बडतर्फ पोलीस शैलेश हरिभाऊ जगताप, परवेझ शब्बीर जमादार, पत्रकार देवेंद्र फुलचंद जैन, प्रशांत पुरुषोत्तम जोशी (36), प्रकाश रघुनाथ फाले (वय 41), विशाल गजानन तोत्रे (36) आणि पत्रकार संजय भोकरे (वय 58) अशी मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
68 वर्षीय महिलेच्या पर्वती येथील जागेचा परस्पर ऋषीकेश बारटक्के याच्याशी व्यवहार करून त्याच्याकडून 70 लाख रुपये घेऊन फसवणूक व विश्वासघात करत जागा बळकवण्याचा प्रयत्न करत जमिनीच्या व्यवहारात तडजोडीसाठी 3 कोटी मागणी केली.
तर बारटक्के याच्यासोबत व्यवहार केल्याने प्रेस कॉन्फरन्स घेऊन बदनामी करत घरी हस्तक पाठवून धमक्या देऊन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत जेलमध्ये सदवण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी नुकतीच चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक आयुक्त रमेश गलांडे हे करत आहेत. तपासात आरोपी हे टोळी करून बराटे हा टोळीप्रमुख असून, तो सदस्याना सांगून कामे करत असल्याचे निष्पन्न झाले, असे समोर आले आहे. त्यानुसार त्याच्यावर मोक्कानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव गलांडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला होता. त्यानुसार या टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी मोक्का कारवाईचा आदेश दिला आहे.