मुंबई : राज्यातील भाजपाच्या दोन चार नेत्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय आपल्या विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणेकडून सुरु असलेल्या कारवाया थांबणार नाहीत. ते बदल्याच्या भुमिकेतून वागत असताना आपण का शांत बसायचे असा संताप मंत्री मंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी व्यक्त केला. भाजपाच्या नेत्यांचे मागील पंचवार्षिक काळातील रेकाॅर्ड काढून कारवाया करा अशा मागणी यावेळी करण्यात आली.
बैठकीत नियमीत विषयावरील चर्चेनंतर अधिकारी वर्गाला जाण्यास सांगितले. त्यानंतर सध्याच्या राजकारणावर वादळी चर्चा झाली. महाविकास आघाडीचे नेते भ्रष्ट असल्याचे चित्र भाजपाकडून रंगविले जात आहे. सरकारकडे भाजपाच्या बर्याच नेत्यांची बरीच प्रकरणे आहेत. पण त्यावर कारवाई करत नसल्याने त्यांना सरकारची भिती वाटत नाही अशी भावना अनेक मंत्र्यांनी बोलून दाखवली. मागील सरकारच्या काळात सहा ते सात खात्यांमध्ये मोठे घोटाळे झाले आहेत ही माहिती समोर आणली पाहिले तसेच कारवाई देखील केली पाहिजे अशा संतप्त भावना मंत्र्यांनी व्यक्त केल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत आक्रमक होते. कधी नव्हे इतक्या खालच्या पातळीचे राजकारण भाजपा खेळत असल्याचे सांगतांना त्यांनी आज सुरु असलेल्या कारवायांच्या घाबरण्याचे तसेच त्यांच्या दबावाखाली येण्याचे कारण नाही. भाजपाच्या मंत्र्यांच्या खात्यांचा ट्रॅक रेकाॅर्ड काढा अन पुढची पावले उचला, शेवटी माझी मदत घ्या असे निर्देश त्यांनी मंत्र्यांना दिले असल्याचे सुत्रांनी म्हंटले आहे.
मागील सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजना, वन खात्यातील 33 कोटी वृक्षलागवड, उर्जा खात्यातील कथित गैरव्यावहार, जलसंपदा विभाग आदी खात्यांच्या फाईलींवर चौकशी सुरु आहे.