पुणे : शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्याने पुण्यातील उद्धव ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नवी पेठ मधील पत्रकार भवन परिसरात दोन्ही गट समोरासमोर आल्याने जोरदार घोषणाबाजी होऊन पदाधिकाऱ्यांत धक्काबुक्की झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्यात आले.
पुण्यात शिवसेनेचे चिन्ह आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्याने कार्यकर्त्यांनी बालगंधर्व चौकात शनिवारी दुपारी आंदोलन केले. त्यानंतर ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी नवी पेठेतील पत्रकार भवन परिसरात एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी आले. याचवेळी शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि इतर पदाधिकारी दाखल झाले होते.
शिंदे गटाचे पदाधिकारी पत्रकार संघात बसलेले असताना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी रस्त्यावर कार्यक्रमात सहभागी झाले होते. मात्र, यावेळी ठाकरे गटाच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्या. त्याचप्रमाणे शिंदे गटाविरोधात टीका करण्यात आली.
त्यामुळे भानगरी यांच्यासह शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक होत ते पत्रकार संघातून बाहेर आले. आणि त्यांनी थेट कार्यकर्त्यांच्या घोळक्यात घुसून मुख्यमंत्र्यांचा अपमान करू नका व्यवस्थित रित्या घोषणाबाजी करा असे म्हणत कार्यकर्त्यांनी शांत करण्याचे प्रयत्न केले. मात्र यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी सुरू केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली.