नवी दिल्ली : दिल्ली येथे शेतकरी आंदोलनास हिंसक वळण लागले आणि आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. लाल किल्ल्यात घुसलेल्या आंदोलकांनी शीखांचा धर्मध्वज फडकावल्यानं मोठा वादंग माजला आहे. यावर अभिनेत्री कंगना रणैत हिने आक्रमक प्रतिक्रिया दिल्याने तिच्या अंगलट आले आहे.
प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर हल्ला करण्यात आला. तिथे खलिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला आहे. कोरोना संकटावर आपण यशस्वी मात करत पुढे गेलो. याशिवाय या संकट काळात आपण पूर्ण जगाचं प्रतिनिधित्व करत आहोत. मोजक्याच देशांना हे यश मिळालं आहे. त्याच देशांपैकी आपण एक आहोत, असं कंगनाने व्हिडिओद्वारे म्हटलं होतं.
लाल किल्ल्याचे फोटो येत आहेत. हे दहशतवादी जे स्वत: ला शेतकरी म्हणतात त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे. सर्वांसमोर हा तमाशा सुरु आहे, अशी टीका कंगनाने केली आहे. आज जगात आपली थट्टा होत आहे. आपली काहीच इज्जत राहिलेली नाही. जेव्हा दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष देशात येतो तेव्हा काही लोकं नागडं होऊन बसतात. या देशाचं काहीच होणार नाही. कुणी या देशाला एक पाऊल पुढे घेऊन जात आहे, तर काही लोक देशाला दहा पावलं मागे खेचत आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका आणि त्यांचं समर्थन करणाऱ्यांना जेलमध्ये टाका. त्यांची संपत्ती देखील हिसकावून घ्या, असं विधानही कंगानाने केलं होतं.
कंगनाच्या या विधानानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात सुरुवात केली. यासोबतच सहा दिग्गज ब्रँण्डने कंगनासोबतचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं आहे. याची माहिती स्वत: कंगनाने ट्विटरद्वारे दिली आहे. कंगना याबाबत म्हणाली की, ‘सहा ब्रँण्डनी माझ्यासोबतचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले. काहींवर मी याआधीच करार केले होते. तर काही ब्रँण्डसोबत करार करणार होते. ते म्हणाले की, मी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाले, त्यामुळे ते मला त्यांची ब्रँण्ड अॅम्बेसेडर बनवू शकत नाहीत. त्यामुळे या सर्व ब्रँण्डना देखील मी अँटी नॅशनल दहशतवादी म्हणेन, असं कंगनाने स्पष्ट केलं आहे.