पुणे : नववर्षांच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पर्यटन स्थळांवर नववर्ष स्वागतासाठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पर्यटनस्थळी रात्र जमावबंदी आदेश जारी केला. शुक्रवार 25 डिसेंबर ते 5 जानेवारी पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी लागू राहणार आहे. पुणे ,पिंपरी चिंचवड या महापालिका क्षेत्रात रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी ग्रामीण भागात गर्दी होण्याची शक्यता आहे.
यामुळं एमटीडीसीच्या निवासस्थानांचे आरक्षण केलेल्या पर्यटकांचा मात्र हिरमोड होणार आहे. नववर्षाच्या निमित्ताने mtdc ची सर्व निवासस्थानांची आरक्षणे फुल्ल झाली आहेत. 31 डिसेंबरला या ठिकाणी सांस्कृतिक, मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते.
तळेगाव दाभाडे, चाकण, आळंदी या नगरपरिषदांचा भाग,तळेगाव, चाकण midc,हिंजवडी आयटी पार्क तसंच लोणावळा,अॅम्बी व्हॅली, लवासा, भुशी डॅम, मुळशी धरण, ताम्हिणी घाट, सिंहगड रस्ता, खडकवासला या पर्यटनस्थळांसह मावळ, मुळशी आणि हवेली तालुके याशिवाय विविध फार्म हाऊस, निवासस्थाने (रिसॉर्ट्स ) या ठिकाणी रात्र जमावबंदी लागू करण्यात आली आहे.