पिंपरी : कोरोना, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर गेली आहे. त्यामुळे 13 मार्च पासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट असणार आहे. महापालिका प्रशासकपदी आयुक्त राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी आज (गुरुवारी) काढला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, कोरोना, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामुळे महापालिका निवडणूक वेळेत झाली नाही. निवडणूक लांबणीवर गेली आहे. त्यामुळे 13 मार्चनंतर महापालिकेवर प्रशासक राजवट असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने माहे मार्च-एप्रिल 2022 मध्ये मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका विहीत वेळेत घेणे शक्य होणार नसल्याचे तसेच संबंधित नागरी स्थानिक संस्थांची मुदत संपताच तेथे प्रशासकांची नियुक्ती करण्याबाबत कळविले आहे.
भारतीय संविधानातील अनुच्छेद 243 U तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 6. 6(अ) मधील तरतुदीनुसार महापालिकेची मुदत ही पहिल्या बैठकीपासून जास्तीत-जास्त पाच वर्षांची असल्यामुळे ही मुदत पुढे सुरू ठेवता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी व विशेषतः कलम 452 अ च्या (1अ) व (1ब) मधील तरतुदीनुसार 13 मार्च 2022 रोजी मुदत संपत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासक पदी आयुक्त राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आयुक्त पाटील यांनी महानगरपालिकेची विहीत मुदत संपताच प्रशासक म्हणून कार्यभार स्विकारावा तसेच अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करावी असे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी आदेशात म्हटले आहे.