पुणे : व्यावसायिकाकडून तीन कोटी रुपयांची जमीन नावावर करून घेत त्यानंतर ५८ गुंठे जमीन बळकावण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे आणि हाताने मारहाण केल्याच्या गुन्ह्यांत ॲड. दिप्ती काळेच्या साथीदारास फरासखाना पोलिसानी अटक केली.
न्यायालयाने त्याला ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नितीन मनोहर हनमे (३१, रा. संतोष नगर, कात्रज ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी ॲड. दीप्ती काळे (४५, बावधन), निलेश शेलार (रा. कोथरूड) आणि आणखी दोन आरोपींविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ३३ वर्षिय महिलेने फिर्याद दिली आहे.
यातील आरोपी दिप्ती काळे हिचा मंगळवारी ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. ॲड. काळे हिने फिर्यादीच्या पतीबरोबर जवळीक साधली होती. त्यानंतर काळे हिने फिर्यादीच्या पतीस बांधकाम व्यवसायासाठी ३५ लाख रुपये दिले होते. त्या बदल्यात त्यांच्या पतीकडून कोयाळी, मरकळ (ता.खेड) येथील तीन कोटी रुपयांची ४२ गुंठे जनीन स्वत:च्या नावावर करुन घेतली होती. तर उरलेली ५८ गुंठे जमीन नावावर करुन दे नाहीतर तुझ्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन, त्याला जेलमध्ये आयुष्यभर सडवेल, अशी धमकी दिली.
यानंतर निलेश व नितीन यांनी फिर्यादीच्या पतीला हाताने मारहाण करुन ५८ गुंठे जमिन नावावर करून द्या नाहीतर तुझ्या नव-याला आम्ही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. दरम्यान आरोपी वकिल महिलेने फिर्यादी महिलेला तीचे व तीच्या पतीचे स्वत: बरोबरचे एकत्रित असलेले फोटो पाठवून मानसिक त्रास दिला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेश तटकरे तपास करीत आहेत.
चौकट :
धमकाविण्यासाठी रिव्हॉल्वरचा वापर
हा गुन्हा गंभिर स्वरूपाचा आहे. फरार असलेले इतर दोन आरोपींचा शोध घेणे, या गुन्ह्यांत आरोपींनी रिव्हॉल्वर वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याबाबत तपास करून ते जप्त करायचे आहे. गुन्हा करण्यासाठी आरोपी हनमे याला काही रक्कम मिळाली आहे का, कोयाळी, मरकळ येथील जमीन व्यवहार कशाप्रकारे झाला आदी तपास करण्यासाठी त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिल किरण बेंडभर यांनी केली.