‘त्या’ उद्योजकाच्या बंगल्यात एअर रायफल, 31 काडतुसे अन बरेच काही….

0

पुणे : खंडणी, जीवे मारण्याची धमकी, बेकायदा जमीन बळकाविणे, खासगी सावकारीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या औंध येथील गायकवाड कुटुंबीयांच्या घराची पोलिसांनी नुकतीच घरझडती घेतली. त्यात पोलिसांना ईएसए मॉडेल २०० एअर रायफल, 31 जीवंत काडतुसे असलेले 32 कॅलीबरचे दोन बॉक्स, नोटा मोजण्याचे दोन मशीन आणि नानासाहेब गायकवाड, संजीव मोरे व इतर 70 लोकांकडून खरेदी खत तयार केलेले व त्यावर कोणाच्याही सह्या नसलेले खरेदी खत मिळून आले आहे.

या प्रकरणी अटकेत असलेल्या नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड (70), नंदा नानासाहेब गायकवाड (65) आणि गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (सर्व रा.एनएसजी हाऊस, औंध) यांच्या पोलिस कोठडीत तीन सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.

पोलिसांना गायकवाड यांच्या घरात दोनपानी कागद मिळाला असून त्यावर 14 लोकांची नावे आहेत. नावांच्या पुढे त्यांना कर्जाने दिलेली रक्कम लिहण्यात आली आहे. त्यांच्या घरातील सीसीटीव्हीचे संच बंद असून उपलब्ध असलेल्या डीव्हीआर तसेच तेथील इतर ईलेक्ट्रानिक साधनांमध्ये छेडाछाड केल्याचे दिसून आले आहे. तसेच अनेक कागदपत्रे फाईल्समधून काढून घेण्यात आले आहे. नानासाहेब गायकवाड यांच्या बेडरुमध्ये पैसे मोजण्याची एक मशीन मिळून आली आहे, अशी माहिती सरकारी वकील विजय फरगडे यांनी शुक्रवारी न्यायालयास दिली.

नंदा गायकवाड हीने इतर साथीदारांच्या मदतीने गुन्ह्याच्या संदर्भातील महत्त्वाचे कागदपत्र व इतर पुरावे नष्ट करण्याच्या अनुषंगाने इतर ठिकाणी हलविले आहे. नानासाहेब गायकवाड हे नेहमी रिव्हॉल्वर सोबत ठेवत. गणेश गायकवाड हा तो वापरत असेलेल मोबाईल मुंबई येथे विसरला असल्याचे चौकशीमध्ये सांगत आहे, अशा बाबी पोलिस तपासात निष्णन्न झाल्या आहेत. गुन्ह्यांच्या पुढील तपासासाठी आरोपींना 15 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी ॲड. फरगडे यांनी केली.

मुळ फिर्यादीतर्फे ॲड. पुष्कर दुर्गे, ॲड. सचिन झालटे, ॲड. ऋषिकेश धुमाळ यांनी कामकाज पाहिले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.