पुणे : महाराष्ट्रात पुढच्या वर्षी होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकीत अजितदादांनी एकचा, दोनचा वॉर्ड करावा किंवा त्यांनी तिघांनी एकत्र लढावे. तरीही महाराष्ट्रातील या दहा महापालिकांमध्ये भाजपच सत्तेत येणार, असा दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एक सदस्यीय वॉर्ड आणि इतर महापालिकांसाठी दोन सदस्यीय वॉर्ड रचना करावी अशी सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी केली आहे. तसेच, दोन दिवसांपूर्वी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दररोज रात्री आपण झोपेतून उठून सरकार आहे की पडलं हे बघत असल्याचे खोचक विधान केले होते. त्यावर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष काकडे यांनी अजितदादांनी रात्रीची शांत झोप घ्यावी असं दचकून जागं होऊ नये. कारण, महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात भाजपाला बिलकूल स्वारस्य नाही. असे व्यक्तव्य केले आहे.
सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश कोरोनामुक्त करण्यासाठी व देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची कोरोना हीच प्राथमिकता असल्याचे सांगितले आहे. अशा काळात राजकारण करणे योग्य नाही. असे आमचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संस्कार आहेत. त्यामुळे अजित दादा आपण सरकार पडण्यासंबंधी बिलकूल काळजी करू नका. शांतपणे झोपा आणि दिवसभर काम करा. राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवा, असे संजय काकडे म्हणाले.