अजित दादा कायम विरोक्षी पक्षनेते राहावेत असे वाटत नाही : फडणवीस

0

मुंबई : काल विधानसभेत विरोधी पक्षनेता अजित पवार यांची निवड झाल्यानंतर अभिनंदनाच्या प्रस्तावात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाषण केले. त्यांनी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या. परंतु त्यांच्या एका वाक्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. फडणवीस म्हणाले, अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या खर्‍या पण त्यांनी ते कायम विरोक्षी पक्षनेते राहावेत असे वाटत नाही. फडणवीसांच्या या वाक्याने राष्ट्रवादीसह सर्वांनाच धक्का दिला.

अजित पवारांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, खरे म्हणजे आपल्याकडे एक पद्धत आहे की विरोधी पक्षनेत्याचे वर्णन करताना तुम्ही खूप चांगले विरोधी पक्षनेते आहात त्यामुळे तुम्ही कायम तिथे राहावे असे म्हटले जाते. पण मी हे लोकशाहीत मान्य करत नाही. मला असे वाटत नाही. तुमच्या मनात तुम्हाला जिथे जायचे आहे त्याचा प्रयत्न तुम्ही नक्की कराल. त्यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. पण जोपर्यंत तुम्ही त्या पदावर आहात त्याला न्याय जरूर द्यावा.

फडणवीसांनी अजित पवार यांच्या केलेल्या या कौतुकाने सर्वांचे लक्ष वेधले. फडणवीस आणि अजित पवार यांची मैत्री आता गुपित राहिलेली नाही, यापूर्वीच्या दोघांचा एकत्र सत्तेचा प्रयोग महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यामुळे हे समीकरण भविष्यात केव्हाही दिसू शकते, अशी शंका फडणवीसांच्या त्या वाक्यानंतर अनेकांच्या मनात निर्माण झाली. फडणवीसांच्या या वाक्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पोटातही गोळा आला असावा.

आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवार यांनी सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषविले आहे. अनेकदा मुख्यमंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली. अल्पकाळाचे जे सरकार आम्ही स्थापन केले, त्यावेळी जे झाले ते तसेच राहिले असते तर अजित पवार देखील नक्कीच अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री झाले असते. जयंत पाटील यांना टोला लगावताना फडणवीस म्हणाले, आजही तुम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खासगीत विचारले तर अजित पवारांनी जे पाऊल उचलले होते ते योग्यच होते असेच तुम्हाला कळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.