अजित पवार-फडणवीसांची गुप्त भेट ?; ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं

0

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेसह राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभा, विधानपरिषद या दोन्ही निवडणुकीत भाजपाने अगोदरच पराभव केल्याने त्यामधून पुरते सावरलेले नसतानाच शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडीला तिसरा आणि सर्वात मोठा धक्का बसला आहे.

या राजकीय उलथा-पालथीनंतर सर्वांना आठवला तो देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी सोहळा. पण त्यावेळी बंडाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाली होती. विशेष म्हणजे आताही फडणवीस-अजितदादा या नेत्यांबाबत एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपानंतर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवा यांनीही पत्रकार परिषदेत आमच्याकडेही असे बंड झाले होते अशी आठवण करून दिली आहे. या दरम्यान आणखी एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही दिवसांपूर्वी गुप्त भेट झाल्याची ही माहिती आहे.

या सर्व राजकीय गदारोळात राज्याचे अजित पवार कुठे आहेत, अशी राजकीय कुजबुज सुरू होती. मात्र, अजित पवार हे नेहमी प्रमाणे मंत्रालयात बैठका घेत असल्याचे दिसून आले आहे. असे असले तरी अशीही माहिती समोर येत आहे की, राज्यात शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी होण्यापूर्वी काही दिवस अगोदर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात भेट झाली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषद निवडणुकीच्या काळात रात्री उशिरा गुप्त भेट झाल्याची माहिती आहे. या बैठकीत नेमकी चर्चा काय झाली ? हे अद्याप समजलेले नाही. मात्र, अशी भेट झाल्याची माहिती जेव्हा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळाली त्यावेळी दोघांनीही तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला काही मिनिटे शिल्लक राहिलेले असताना अजित पवार, मंत्री जयंत पाटील, एकनाथ शिंदे मतदानासाठी शेवटच्या क्षणी मतदान स्थळावर पोहोचले होते.

दरम्यान, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांनी बंडखोरी करण्यासाठी गुजरातमधील सूरत निवडल्यानंतर या पाठीमागे कोण सूत्रधार आहेत, याचे बर्‍यापैकी चित्र स्पष्ट झाले होते. आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे 40 आमदार गुवाहाटीमध्ये पोहचले आहेत.

2019 मध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याबाबतही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असताना अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह बंडखोरी करून भाजपासोबत गेले होते. भाजपाने अजित पवार गटासोबत शपथग्रहण करून सत्तास्थापन केली होती. पण दीड दिवसांत ते सरकार पडले होते. आता एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. शिंदे यांचे बंड किती यशस्वी होते ते येत्या काही तासांमध्येच समजणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.