मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार लवकरच भाजपमध्ये जाणार आहेत, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या जवळकीची चर्चा रंगली असतानाच अंजली दमानियांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळाच चांगलीच चर्चा रंगली आहे.
अंजली दमानिया यांनी ट्विट करुन हा दावा केला आहे. ट्विटमध्ये अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवले आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. बघू आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची.
राज्याच्या सत्तासंघर्षावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाच्या आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. त्याचाच संदर्भ देत सरकारमधून 15 आमदार बाद होणार, असा दावा अंजली दमानिया केला आहे. शिंदे गटाचे 15 आमदार अपात्र ठरल्यानंतर सरकार अल्पमतात येईल व महाराष्ट्रासारखे मोठे राज्य गमावणे भाजपला परवडणारे नाही. अशात भाजप अजित पवारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल व सरकार वाचवण्यासाठी काही आमदारांसह अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करतील, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
आपल्या ट्विटबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत. मात्र, त्यांची भूमिका तशी दिसत नाही. भाजपविरोधात अजित पवार नरमाईची भूमिका घेताना दिसत आहे. राज्यात अनेक गंभीर विषय असताही यावर अजित पवार म्हणणे मांडत नाहीत व भाजपवर टीका करत नाही.
अंजली दमानिया म्हणाल्या की, दुसरीकडे काही बातम्याही अजित पवार आणि भाजपची जवळीक वाढत असल्याचे दाखवत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडीने अजित पवारांचे नाव वगळले आहे. त्यामुळे ते आता भाजपसोबत जातील असा माझा अंदाज आहे. काल मंत्रालयात एक महत्त्वाची व्यक्ती भेटली, तिनेही माझ्याशी बोलताना हाच अंदाज व्यक्त केला. मला हे सर्व राजकारण चुकीचे व घाणेरडे वाटते. असे राजकारण मला बघवत नाही. त्यामुळेच मी तसे ट्विट केले.
अजित पवार नॉटरिचेबल असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच आले होते. त्यामुळे राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती. याचे ट्विटही अंजली दमानिया यांनीच केले होते. पहाटेच्या शपथविधीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता यावेळी अंजली दमानिया यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली होती. मात्र, अजित पवारांनी माध्यमांसमोर येत हा दावा चुकीचा असल्यायचे लगेच स्पष्ट केले होते.