पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना ललकारले. त्याला प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नारायण पेठेत कार्यकर्त्यांचा मेळावा घेत भाजपवर अप्रत्यक्ष हल्ला चढविला. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हाच सामना यापुढील काळात रंगणार असल्याने, दिवसेंदिवस त्याला धार चढू लागली आहे. भाजप गेल्या दोन निवडणुकीत न जिंकलेल्या 144 लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करीत असताना, बारामतीची जबाबदारी सीतारामन यांच्यावर सोपविली. त्या कालपासून तीन दिवसांच्या दौर्यावर आहेत.
भाजपने आत्तापर्यंत पवारांवर टीका केली असली, तरी त्यांच्याशी बारामती मतदारसंघात थेट आव्हान देण्याचे टाळले होते. या वेळी मात्र निवडणुकीपूर्वी दीड वर्षे त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध प्रचाराचे रणशिंग फुंकले. पवार कुटुंबीयांना मतदारसंघातच अडकवून ठेवताना, त्यांच्याविरुद्ध थेट त्यांच्या भागातच घणाघाती हल्ला करण्याचा डाव त्यांनी रचला. त्यांच्या जोडीला पूर्वीश्रमीचे काँग्रेस व राष्ट्रवादीचे शिलेदारही आहेत. पवारांना पराभूत करू शकतो, अशी मानसिकता मतदारांच्या मनात निर्माण करण्यास त्यांना यश मिळाल्यास, राज्याच्या अन्य भागात राष्ट्रवादीची ताकद आपोआपच कमी होईल, या पद्धतीने भाजपने रणनिती आखली आहे.
राष्ट्रवादी पक्षातील घराणेशाही, भ्रष्टाचार, सहकारातील राजकारण असे विविध मुद्दे घेत सीतारामन यांनी पवार यांना बारामतीत लक्ष्य केले. या पद्धतीने भाजपने बारामतीमध्ये थेट उतरून प्रथमच हल्ला केला आहे. त्यांची धार भविष्यकाळात वाढत गेल्यास पवार यांची कोंडी करण्याची ती रणनिती ठरू शकते. विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी सीतारामन यांच्या आगमनाबाबत पूर्वीच प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांचे स्वागत केले आहे. त्यामुळे सीतारामन यांचा दौरा झाल्यानंतर राष्ट्रवादी व्यूहरचना आखण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात अजित पवार यांनी आज पुणे शहरात महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी पक्ष कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले.
अजित पवार यांनी पुणे शहरातील आठही मतदारसंघांतील कार्यकर्ते यांचे मेळावे घेतले. स्वबळावर निवडणुकीची तयारी करण्याची त्यांची सूचना कार्यकर्त्यांना हुरुप देऊन गेली. त्याचवेळी त्यांनी राज्यातील सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या सरकारवर हल्ला केला. सत्तेची लालसा, आर्थिक लाभ, दबावाचे राजकारण करीत हे नवे सरकार आले असल्याची टीका त्यांनी केली. तीन महिन्यांत पालकमंत्रीही देता आले नाहीत. शेतकर्यांचे प्रश्न सोडविले नाहीत. महागाई वाढते आहे, हे मुद्दे पवारांनी मांडले. त्याचवेळी शिवसेनेला मुंबईत दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाल्याबद्दल शुभेच्छाही दिल्या.