पिंपरी : दक्षिण आफ्रिका आणि युरोपमधून ओमिक्राॅन बाधिताची संख्या वाढत चालली आहे. त्यात भारतात आलेल्या नागरिकांमध्ये दोघे जण पिंपरी चिंचवड शहरातील असल्याची माहिती समोर आली आहे.
दक्षिण आफ्रिका आणि युरोपात ओमिक्रॉनच्या केसेस वाढत असतानाच आणि त्यामुळे महाराष्ट्रासह जगभरात भीती वाटत असतानाच राज्यात 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. विशेष म्हणजे हे सहाही नवे रुग्ण हे दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले आहेत.
महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, भाईंदर, डोंबिवली आणि पिंपरी चिंचवडचा समावेश आहे. त्यामुळेच त्या त्या शहरात सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं जातंय. महापालिका प्रशासनही अलर्टवर आहे. पण हे सहाही रुग्ण हे ओमिक्रॉन विषाणूने संक्रमित आहेत की नाही याचा चाचणी रिपोर्ट येणं अजून बाकी आहे.
दक्षिण आफ्रिकेतून एक जण हा डोंबिवलीत आला आणि त्यानंतर मुंबईलाही हादरले बसले. त्या संबंधीत प्रवाशाची चाचणी झाली. त्याच्या कुटुंबियाचीही झाली. त्यात तो प्रवाशी पॉझिटिव्ह आला. सुदैवानं कुटुंबिय मात्र नेगेटीव्ह निघाले. पण त्याच दक्षिण आफ्रिकेतून महाराष्ट्रात आलेले इतर पाच जण मात्र पॉझिटिव्ह निघालेत. त्यात मुंबई, पुणे, भाईंदरमधल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे तर पिंपरी चिंचवडच्या दोघा जणांचा समावेश आहे.
दरम्यान ह्या सहा जणांना ओमिक्रॉनची लागण झालीय का नाही त्याच्या तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आलेत. जिनोम सिक्वेन्सिंगही करण्यात आलीय. त्याचा रिपोर्ट येणं मात्र बाकी आहे.