पुणे : सर्व महाविद्यालये 11 जानेवारीपासून (सोमवार) सुरू करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. मात्र विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि राज्य शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे.
पुणे विद्यापीठाने प्राचार्य व्ही.बी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. या समितीची बैठक सोमवारी पार पडली. समितीने त्यांच्या शिफारशी व महाविद्यालये सुरू करण्याची पद्धत याचा अहवाल कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना सादर केला आहे.
ऑगस्ट महिन्यापासून बीए, बीएससी, बीकॉमचे प्रथम वर्ष आणि अन्य व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांचे द्वितीय, तृतीय आणि चौथ्या वर्षातील प्रथम सत्राचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहे. त्यांचा प्रथम सत्राचा बहुतांश अभ्यासक्रम संपला आहे. पण प्रॅक्टिकल होत नसल्याने विद्यार्थ्यांना संकल्पना समजण्यास अडचण होत होती. त्यामुळे शाळा सुरू झाल्या, महाविद्यालये सुरू करण्याबाबत मागणी केली जात होती.
इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट, शैक्षणिक, शारीरिक शिक्षण, विधी, बीएससी, एमएससी आदी अभ्यासक्रमांचे प्रथम सत्राचे प्रॅक्टिकल 11 जानेवारीपासून सुरू होतील. तसेच ज्या अभ्यासक्रमांना विद्यार्थी संख्या 50च्या आत आहे, त्यांचे प्रत्यक्ष वर्ग देखील सुरू केले जाणार आहेत.
प्रथम सत्राच्या परीक्षा संपल्यानंतर विद्यापीठातील विभाग व संलग्न महाविद्यालयांनी त्वरित दुसऱ्या सत्राचे थेट वर्ग घेण्यास सुरवात करावी. यासाठी “यूजीसी’, राज्य सरकार यांच्या नियमावलीचे पालन करावे, तसेच स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी असे आदेशात नमूद केले आहे.