मुंबई : “माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील सर्व पुरावे आता ईडीच्या हाती लागले आहेत. त्यामुळे त्यांनाही अटक होईल. अशी प्रतिक्रिया देशमुख यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या अॅड. जयश्री पाटील यांनी दिली आहे.
“मी ईडीच्या कारवाईवर समाधानी आहे. कारण सीबीआयने जो गुन्हा दाखल केला आहे तो माझ्या तक्रारीवर उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत त्यानुसार दाखल केला आहे. ईडीने देखील माझ्या तक्रारीवर अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केलेली आहे. मी दिलेली सगळी माहिती आहे.
मी दिलेल्या पीडित लोकांची माहिती आहे जे अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराने पिळले जात होते. त्यामुळे अनिल देशमुख यांना अटक केली पाहिजे, अशी माझी मागणी होती. कारण अटक केली नाही तर ते पुरावे नष्ट करु शकतात”, असं जयश्री पाटील म्हणाल्या.
“उद्योगपती मुकेश अंबानी प्रकरणाचा डीवीआर अजून सापडलेला नाही. अनिल देशमुख यांच्या दोन सहकाऱ्यांना ईडीने अटक केलेली आहे. त्याचबरोबर अनिल देशमुखांनाही ईडीने बोलावलं आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांनाही अटक होईल”, असा दावा त्यांनी केला आहे.