मुंबई ः “ज्याप्रकारे त्यांनी आपल्या वेब पेजवर किंवा मोबाइल अॅपवर भाषा निवडताना मराठी लवकरच आणत आहोत आणि आपण क्षमस्व आहोत असं त्यांनी टाकलं आहे. मराठीद्वेष दाखवला तेव्हाच आम्ही मनसैनिक अॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार असं सांगितलं होतं. त्याचप्रकारे शुक्रवारी काही फटाके फुटले आणि अॅमेझॉन प्रशासन खडबडून जागं झालं”, अशी माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिली आहे.
मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामध्ये अॅमेझॉनने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अॅमेझॉनने सर्वज डिजिटल प्लॅटफाॅर्मवर मराठी भाषेचा समाविष्ठ करण्याचे आश्वसन दिले आहे, अशी माहिती अखिल चित्रे यांनी दिली आहे.
मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे प्रचंड आक्रमक झाली असून राज्यभरात अॅमेझॉनची कार्यालयं फोडली. मनसे कार्यकर्त्यांनी पुणे, मुंबई आणि वसईमधील अॅमेझॉनच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. ‘मराठी नाय तर अॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजी मनसैनिकांकडून करण्यात आली.मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली.
यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली. कोर्टाने राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला. न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसेने आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचं सांगताना यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा अॅमेझॉनला दिला होता. राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार, अशी प्रतिक्रिया अखिल चित्रे यांनी दिली होती.