अमोल कोल्हे यांची बारी म्हणजे वराती मागून घोड

0

पुणे : अमोल कोल्हे यांची बारी म्हणजे वराती मागून घोडं अशी टीका शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे. “ज्यांना बैलगाडा शर्यत माहित नाही, त्यांना वाटतं अमोल कोल्हेंनी शब्द पाळला. पण त्यांनी शब्द पाळलेला नाही. लोकांची फसवणूक केली आहे,” असा निशाण आढळराव पाटलांनी साधला आहे.

शिवाजी आढळराव पाटील म्हणाले की, “लिंबगाव घाटात नागरिकांची करमणूक झाली. कोल्हे यांनी लोकसभेच्या प्रचारादरम्यान जनतेला आश्वासन दिलं होतं की, बैलगाडा शर्यत ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी पहिल्या बारीसमोर हा पठ्ठया घोडीवर बसून बारी जिंकेल. पहिली बारी पुणे, नगर जिल्ह्याचा विचार करता ११ आणि १२ फेब्रुवारी या दोन्ही दिवशी मावळ आणि आंबेगाव तालुक्यात संपन्न झाल्या आहेत. त्यावेळी हा पठ्ठया कुठे होता हे माहिती नाही. ती खरी पहिली बारी होती”. 
“घोडीवर बसणार असा शब्द दिला होता.

बैलगाडाच्या पुढं पळणारी घोडी कशी असते? ती शेतकऱ्यांना माहिती आहे. बैलगाडा पुढं धावणारी घोडी ही वेगळी असते. त्यांनी आणलेली घोडी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मालिकेमधील होती. तिला स्टुडिओमधून मुंबईतून घेऊन आले होते. ती घोडी धावण्याच्या लायकीची नव्हती. घोडी आणि खासदार बैलांच्या पाठीमागे राहिले आणि बैल पुढे गेले. त्यामुळं ही बारी फसली आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

“शब्द पाळला वैगेरे हे थोतांड आहे. ही केवळ नागरिकांची फसवाफसवी आहे. त्यांनी ही नौटंकी थांबवावी. तीन वर्षे झालं लोकांची खूप करमणूक केली आहे. तीन वर्षे त्यांनी नागरिकांची निराशा केली आहे,” असं यावेळी ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.