मुंबई : महाराष्ट्रातील सचिन वाझे प्रकरण संसदेत उपस्थित करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांना शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत ( arvind यांनी धमकावल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे या प्रकरणी तक्रार केली आहे. महाराष्ट्रात तू कशी फिरते ते बघतोच. तुलाही तुरुंगात डांबू, अशी धमकी अरविंद सावंत यांनी दिल्याचं नवनीत राणा यांनी पत्रात म्हटंलं आहे.
मुंबईतील मनसुख हिरन मृत्युप्रकरणी सचिन वाझे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी आपण लोकसभेत प्रश्न उपस्थित केले. यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला संसदेच्या लॉबीमध्ये धमकावलं. यापूर्वीही आपल्याला शिवसेनेच्या लेटरहेडवरून आणि फोनवरून अॅसिड हल्ल्यासह जिवे मारण्याची धमकावण्यात आलं आहे, असं राणा यांनी पत्रात म्हटलं आहे. या प्रकरणी पोलीस कारवाईची मागणी त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे.
नवनीत राणा यांनी केलेले आरोप शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी फेटाळून लावले आहेत. नवनीत राणा या एक महिला आहेत आणि आपल्याला भेटल्यावर त्या नेहमी दादा-भैया म्हणत असतात. महिलांना धमकावण्याचं काम शिवसेना करत नाही. मी त्यांना धमकावलं आहे हे त्यांच्या सोबत असलेल्या लोकांनी सांगावं. पण त्यांची चर्चा करण्याची पद्धत आहे ती योग्य नाहीए, असं अरविंद सावंत म्हणाले.
तुम्ही नवनीत राणा यांचे आधीचे व्हिडिओ पाहू शकता. त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत असतात. पण चर्चा करताना त्यांची बॉडी लँग्वेज बघा, अतिशय घृणास्पद आहे. तरीही आम्ही काहीही बोलत नाही. त्यांनी यापूर्वीही असा दावा केला आहे आणि आजही तेच म्हणत आहेत. मी त्यांना का धमकी देऊ? त्या योग्य पद्धतीने बोलत नाहीएत. ते ठीक नाही, असं अरविंद सावंत म्हणाले.
लोकसभेत खासदार नवनीत राणा यांना धमकावलं आहे. पण ही धमकी कोणी दिली, ते बघता आलं नाही, असं YSRCPच्या एका खासदाराच्या म्हटलं आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. दरम्यान, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी धमकावल्याचं नवनीत राणा यांनी आपल्याला सांगितलं. खासदाराचं हे वर्तन योग्य नाही. हे प्रकरण गंभीरतेने घ्यावं, अशी मागणी आपण लोकसभा अध्यक्षांकडे करणार आहोत, असं भाजपच्या खासदार रमा देवी यांनी सांगितलं.