लष्करातील अधिकाऱ्यास सात दिवस पोलिस कोठडी

लेखी पेपर फुटी प्रकरणात

0

पुणे : लष्करभरती प्रक्रियेतील लेखी पेपर फुटी प्रकरणात गुन्हे शाखेने तामिळनाडून अटक केलेल्या लष्करातील अधिकाऱ्याला न्यायालयाने १५ मार्चपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. या अधिका-यानेच व्हाटसअपवरून प्रश्‍नपत्रिका लिक केल्याचे समोर आल्याचे समोर आले आहे.

थिरू मुरुगन थंगवेलू (४७, रा. तमिळनाडू) असे या अधिका-याचे नाव आहे. तो मेजर रॅंकच्या अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आपणच पेपर लिक केल्याचे त्याने पोलिसांकडे कबूल केले आहे. या गुन्ह्यात यापूर्वी किशोर महादेव गिरी (वय ४०, रा. बारामती), माधव शेषराव गिते (वय ३९, रा. सॅपिअर विहार कॉलनी), गोपाळ युवराज कोळी (वय ३९, रा. दिघी), उदय दत्तू औटी (वय २३, रा. खडकी), भारत लक्ष्मण अडकमोळ (वय ३७, रा. पाचोरा) यांना अटक करण्यात आली आहे. तर कुमार परदेशी (रा. सातारा) आणि योगेश ऊर्फ गोट्या शंकर गोसावी (रा. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

थंगवेलू याला शनिवारी तमिळनाडूतून अटक करीत रविवारी पुण्यात आणण्यात आले होते. लष्कराच्या रिलेशन आर्मी अंतर्गत गेल्या आठवड्यात पुण्यासह देशात ४३ ठिकाणी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार होती. या परीक्षेत देशभरातील ४० हजार उमेदवार बसले होते. मात्र या परिक्षेतील प्रश्नपत्रिका पुण्यात फुटली असल्याची माहिती लष्करी गुप्तचर (एमआय) विभागाने पुणे पोलिसांना दिली होती.

त्यानुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वानवडी व विश्रांतवाडी येथे दाखल दोन वेगवेगळ्या प्रकरणात काही जणांना अटक केली होती. त्यामध्ये एका लष्करी कर्मचारी, एक निवृत्त कर्मचारी व अन्य काही जणांचा समावेश होता. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही लष्करी अधिकाऱ्याची नावे पुढे येण्याची शक्यता असल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाला महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तमिळनाडूच्या वेलिंग्टन येथून शनिवारी मध्यरात्री लष्करातील एका मेजर रैंकच्या अधिकाऱ्याला अटक केली.

प्रश्‍नपत्रिका कशा मिळाल्या हे अद्याप स्पष्ट नाही :
या गुन्ह्यातील आरोपी अडकमोळ याच्यासोबत असलेले व्हॉटसअपवरील चॅटिंग थंगवेलू यांनी डिलीट केले आहे. ते संभाषण नेमके काय होते याचा तपास करावयाचा आहे. तसेच या प्रश्‍नपत्रिका थंगवेलू याला कोणाकडून मिळाल्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्या पोलिस कोठडी देण्याची मागणी सरासरी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने थंगवेलू याला १५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Leave A Reply

Your email address will not be published.