भोसरीत उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुउद्देशीय स्टेडिअम
तांबड्या मातीतील पैलवान महेश लांडगे यांचे स्वप्न अखेर साकार!
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदार संघात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडिअम उभारण्याचा संकल्प ‘व्हीजन-२०२०’अंतर्गत करण्यात आला होता। त्या अनुषंगाने मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुउद्देशीय स्टेडिअम उभारण्यात येत आहे. या कामाला महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तांबड्या मातीतील पैलवान आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पाहिलेले स्वप्न अखेर दृष्टीक्षेपात आले आहे.
‘व्हीजन-२०२०’अंतर्गत मोशी येथील ११ एकर जागेवरील या उपसुचनेच्या प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत मंगळवारी मंजुरी देण्यात आली. अनुषंगाने तब्बल २५ हजार आसन क्षमतेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्राशी बांधिलकी जपणारे आमदार महेश लांडगे यांनी भोसरी मतदार संघाच्या विकासासाठी नेहमीच शड्डू ठोकला आहे. भोसरीच्या नाव लौकिकात भर पडावी म्हणून आमदार लांडगे यांनी ललित कला विभाग, शासकीय इंजिनीअरिंग महाविद्यालय, एज्युकेशन सेंटर सुरु करण्यसाठी प्रयत्न केले. त्याला यशही मिळाले. या बरोबरच भोसरीची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्टेडीयम उभारण्याचे स्वप्न पाहिले. ते प्रत्यक्षात साकारही होणार आहे. त्यामुळे दिलेला शब्द पाळणारा आमदार म्हणजे महेश लांडगे असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. ‘भोसरी व्हीजन- २०२०’ अभियानांतर्गत घेतलेले अनेक मुद्दे आमदार लांडगे मार्गी लावताना दिसत आहेत. त्यापैकी मोशी येथील स्टेडीयमचा समावेश आहे. या विषयाला नुकतीच मंजुरी मिळाली. पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे होत्या. मोशी येथील सर्वे नं. ४४४ (जुना ४४५) आरक्षण क्रमांक १/ २०४ येथे बहुउद्देशीय स्टेडिअम उभारण्याच्या प्रस्तावित कामाला प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी उपसूचना माजी महापौर नितीन काळजे यांनी दिली होती. या उपसूचनेला माजी महापौर राहुल जाधव यांनी अनुमोदन दिले आहे. सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करुन हे बहुउद्देशीय स्टेडिअम उभारण्यात येणार आहे. त्याला सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबाबत ‘बीआरटीएस’ विभागाचे उपअभियंता संजय साळी म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराला अद्याप आंतराष्ट्रीय दर्जाचे एकही स्टेडिअम नाही. शहरातील क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रस्तावित स्टेडिअम महत्त्वाकांक्षी ठरणार आहे. या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, आता प्रकल्प सल्लागार नेमण्यात येईल. त्यानंतर आराखडा मंजूर करुन निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. आगामी दोन ते अडीच वर्षांमध्ये स्टेडिअमचे काम पूर्ण होईल. या स्टेडिअममुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर शहराची ओळख निर्माण होईल. आमदार लांडगे म्हणाले की, आम्ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी अन्य शहरांमध्ये देशात किंवा देशाबाहेरही गेलो आहे. त्यावेळी आपल्या शहरामध्ये अशाप्रकारचे भव्य स्टेडिअम असावे. देश-विदेशातील खेळाडू आपल्या शहरात यावेत. आपल्या शहराचे नाव क्रीडा क्षेत्रात अग्रक्रमाने घेतले जावे. शहरातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे, अशी भावना होती. त्यामुळेच महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुन आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडिअम उभारण्याचे काम हाती घेतले आहे. |
|