जातीचे बांध ओलांडून संघटन मजबूत केल्याशिवाय संघटना उभी होत नाही
बहुजन रयत परिषदेच्या राज्य चिंतन बैठकीत प्रा. लक्ष्मण ढोबळे यांचे प्रतिपादन
पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दलितोद्धाराची चळवळ कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी जिद्दीने व ताकदीने पुढे नेली. त्याप्रमाणे जातीचे बांध ओलांडून संघटन बांधल्याशिवाय संघटना उभे होत नाही. गाव, तालुका व जिल्हास्तरावरील समितीमध्ये जोपर्यंत एकजूट नाही, तोपर्यंत सामाजिक परिवर्तन सांगण्याचा अधिकार मिळत नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केले.
बहुजन रयत परिषदेच्यावतीने मातंग समाजाच्या प्रश्नाविषयी ज्या मागण्या होत्या त्या प्रलंबित असून त्यावर सरकार कडून कोणतीही कार्यवाही झालेली नसून त्यासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी राज्यस्तरीय चिंतन बैठक भोसरीतील इंद्रायणी नगर येथील राणी पुतळाबाई महिला विधी महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. परिषदेच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नवनिर्धार संवाद अभियान 18 जुलै ते 5 सप्टेंबर 2021 या कालावधीत राबविण्यात आले होते. अभियानासाठी 35 दिवसात 28 जिल्ह्यांमध्ये दौरा करण्यात आला होता. शिक्षण, आरोग्य, शासकीय योजना व अंधश्रद्धेला विरोध करून व्यसनमुक्तीचा प्रचार हे या अभियानेच प्रमुख उद्दिष्टे आहेत. यानिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले.
बैठकीस परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष रमेशतात्या गालफाडे, सचिव रवींद्र वाकळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. कोमल साळुंखे, युवक प्रदेशाध्यक्ष अभिजीत ढोबळे, ना.म साठे, बालाजी गायकवाड, ईश्वर क्षीरसागर, सुर्यकांत भालेराव, राजू कसबे यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. लक्ष्मण ढोबळे म्हणाले की, युवकांनो बिडी, सिगारेट, गुटका या व्यसनात अडकू नका. आई-वडीलाची स्वप्ने भंग करू नका. समाजातील तरूण-तरूणींनी वकील, डॉक्टर अश्या उच्च पदावर जावे. श्रमाची प्रतिष्ठा व संस्काराने लाभलेली नम्रता, शिक्षणाबद्दलची आत्मीयता निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे. अनुसूचित जाती व जमातीमधील भटक्या विमुक्तप्रमाणे अ, ब, क, ड प्रवर्ग लागू करावा, या चळवळीने मादिगा पक्षाच्या नेतृत्वाखाली देशातील 8 राज्यात जोर धरला आहे. सेनापती वीर लहुजी वस्ताद यांच्या राष्ट्राच्या पराक्रमाचा रक्तरंजित इतिहास सांगण्यासाठी दौरा आयोजित केला आहे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
बहुजन रयत परिषदेच्या प्रमुख मागण्या
राज्यातील 59 जातीचा अ, ब, क, ड प्रवर्गाप्रमाणे आरक्षण लागू करावे. मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहातील 8 हजार 104 कर्मचार्यांना वेतनश्रेणीप्रमाणे पगार देण्यात यावा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे. कर्मवारी दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा जमीन वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात यावा. महिला बचत गटाला महाराष्ट्र सरकारने कर्जाचा आधार द्यावा. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, क्रांतीसूर्य महात्मा फुले विकास महामंडळ, मा. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ व मा. वसंतराव नाईक विकास महामंडळ हे चारही महामंडळांना 1 हजार कोटींचे भागभांडवल देऊन विकास महामंडळे सुरू करावीत. वीर लहुजी साळवे आयोगातील 82 शिफारसी लागू कराव्यात.