‘अंबानीं’च्या घराजवळ ‘त्या’च ठिकाणी बेवारस दुचाकी सापडली

0

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ ज्या ठिकाणी स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ आढळली त्याच ठिकाणी मंगळवारी बेवारस दुचाकी सापडली आहे. या दुचाकीचा स्कॉर्पिओ प्रकरणाशी काही संबंध आहे का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.

२५ फेब्रुवारी रोजी अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फाेटकांनी भरलेल्या स्काॅर्पिओबाबत तपास सुरू असतानाच स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा, एटीएस अधिक तपास करीत असताना, मंगळवारी दुपारी मलबार हिल येथील वाहतूक पोलिसांच्या नजरेत राखाडी रंगाची सुझुकी एक्सेस (एमएच ०१, डीडी २२२५) दुचाकी सापडली. स्कॉर्पिओ पार्क केलेल्या ठिकाणीच ही दुचाकी पार्क केली होती. स्कॉर्पिओ प्रकरणानंतर अधिक सतर्क झालेल्या पोलिसांनी याबाबत गावदेवी पोलिसांना कळविले.

घटनेची वर्दी मिळताच गावदेवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दुचाकी क्रमांकावरून त्याच्या मालकाची माहिती सापडू शकलेली नाही. पोलिसांच्या वाहन ॲपमध्ये या क्रमांकाची कुठलीही नोंद नाही. पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाला दुचाकीचा नोंदणी क्रमांक, इंजिन क्रमांक आणि चेसिस क्रमांक देऊन मालकाचे तपशील देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे.

ही दुचाकी चोरीची असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, त्याचे स्कॉर्पिओ आणि मनसुख प्रकरणाशी काही संबंध आहे का? या दिशेनेही पोलीस अधिक तपास करीत आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्हीच्या मदतीने ही दुचाकी कोणी व कधी पार्क केली? याबाबतही पथक अधिक तपास करीत आहे.

बेवारस दुचाकी सापडली असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामप्यारे राजभर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.