मुंबई : शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चांदीवाल आयोगासमोर चौकशी सुरु आहे. सचिन वाझेचीही उर्वरित चौकशी पार पडली आहे. त्याच्यासोबत देशमुख हे देखील उपस्थित होते. परंतु देशमुख यांच्याशी निगडीत मनी लाँडरिंग आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेटमध्ये पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या पाठिशी चौकशीचा ससेमिरा लागला आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आयपीएस बदली रॅकेटप्रकरणी ईडी आता पोलीस उपायुक्त दर्जांच्या अधिकाऱ्यांची चौकशी करत आहे. यामध्ये पुणे पोलीस दलातील एका पोलीस उपायुक्तांचा देखील समावेश आहे. यापूर्वी ईडीने राज्याच्या गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना समन्स बाजवत चौकशीला बोलावलं होते. काही दिवसांपूर्वी सीताराम कुंटे यांनाही चौकशीला बोलावलं होत.
या प्रकरणात नुकतेच आणखी एका पोलीस उपायुक्तांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. ट्रान्सफर पोस्टिंग प्रकरणात ईडीने पुणे पोलीस उपायुक्त यांची चौकशी केली आहे. ईडीने त्यांना गुरुवारी समन्स पाठवले होते. त्यानंतर ते ईडीच्या कार्यालयात पोहोचले.
त्यावेळी त्यांची 7 तास कसून चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवला आहे.