मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशीसाठी बोलावले होते. मात्र अनिल देशमुख यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली आहे.
अनिल देशमुखांनी वय, आजारपण आणि करोनाच्या धोक्याचे कारण पुढे करत ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.
अनिल देशमुख यांनी अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे.
अनिल देशमुख यांच्या या भूमिकेनंतर ईडीने पुन्हा त्यांना निरोप धाडला आहे. चौकशीसाठी कार्यालयात २४ तासांत हजर राहा, अन्यथा घरी येऊन चौकशी करणार, असे ईडीने अनिल देशमुख यांना म्हटले आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख नक्की कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
तत्पूर्वी, ईडीने २५ जूनला समन्स बजावून मला दुसऱ्या दिवशी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. ईसीआयआरमध्ये उल्लेख केलेली कागदपत्रं मी प्रतिनिधींकडून पाठवत आहे.
आजही (२९ जून) मी स्वतः चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझं वय ७२ वर्ष आहे, आजारपण आणि करोना होण्याच्या धोक्यामुळे मी हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाईन रेकॉर्ड करा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी जबाब नोंदवेन. मात्र त्याआधी ईडीने प्रश्नांची कॉपी पाठवावी’ अशी मागणी अनिल देशमुखांनी पत्राद्वारे केली आहे.