सांगली : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज (शनिवारी) सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. तेथील महामार्ग लोकार्पण कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या दुष्काळी तालुक्यांतून जाणाऱ्या नव्या पुणे – बेंगलोर महामार्गाची घोषणा केली. रस्त्यासाठी चाळीस हजार कोटींची तरतुद केली जाणार आहे. यामुळे सध्याच्या पुणे – बेंगलोर महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
”प्रस्तावित पुणे – बेंगलोर महामार्ग पुणे, सातारा, खंडाळा, फलटण, खटाव, खानापूर, तासगाव व कवठेमहांकाळ असा होईल. पुण्यात रिंग रोडला जोडला जाईल. यानिमित्ताने मुंबई ते बेंगलोर असा थेट महामार्ग अस्तित्वात येईल. महामार्गांच्या कामावेळी आम्ही स्वखर्चाने शेतकऱ्यांना शेततळी काढून देऊन, तेथील माती, दगड आदी साहित्य महामार्गासाठी वापरु. यानिमित्ताने जलसंधारणाचेही काम होईल. असं नितीन गडकरी म्हणाले.
”रांजणीजवळ (सांगली) 2 हजार हेक्टर जागा असल्याचे कळते. सरकारने ती जागा मला द्यावी. तेथे ड्रायपोर्ट, लॉजिस्टिक पार्क, सॅटेलाईट पार्क उभा करु. विमान उतरेल असा साडेतीन किलोमीटरचा कॉंक्रीटचा रस्ता तयार केला जाईल. पोर्टसाठी अर्धा – अर्धा खर्च राज्य व केंद्र शासन करेल.” अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.
पुढे बोलताना गडकरी म्हणाले, ”महामार्गांवर सर्व लोहमार्गांवर आम्ही भुयारी रस्ते किंवा उड्डाणपूल उभारले.
शहरांतही अनेक ठिकाणी लोहमार्ग आहेत. या सर्व ठिकाणी पूल किंवा भुयारी रस्ते उभारुन महाराष्ट्र फाटकमुक्त करण्याचा निर्धार आहे. महामार्गांवर 120 प्रतितास या गतीने प्रवासाला परवानगी देणार आहोत. नव्या महामार्गांसाठी केंद्र शासन 40 टक्के सिमेंट आणि स्टीलचा वापर करते, पण कंपन्यांनी काळाबाजार सुुरु केला, त्यामुळे आता बुटामीनचा वापर वाढविणार आहोत.
अन्नदाता असणारा शेतकरी यानिमित्ताने उर्जादाताही बनेल. बुटामीनसाठी दिल्लीत लवकरच बैठक घेणार आहे. महामार्गांसाठी त्याचा वापर सक्तीचा करणार असल्याचंही ते म्हणाले.”
दरम्यान, यावेळी रत्नागिरी – नागपूर महामार्गांतर्गत सांगली ते सोलापूर दरम्यानच्या बोरगाव ते वाटंबरे आणि सांगली – सोनंद जत या महामार्गांचे लोकार्पण नितीन गडकरींनी डिजीटल पद्धतीने केले. यावेळी जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, रणजितसिंह नाईक – निंबाळकर, विक्रम सावंत, जयंत आसगावकर, अरुण लाड, अनिल बाबर, मानसिंगराव नाईक, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सुभाष देशमुख, मकरंद देशपांडे, पृथ्वीराज देशमुख, प्राजक्ता कोरे आदी उपस्थित होते.