मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यापाठोपाठ आता आणखी एका महाविकास आघाडीच्या मंत्र्यावर ईडीने कारवाई केली आहे. राम गणेश गडकरी साखर कारखाना व्यवहार प्रकरणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीने 13 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. प्राजक्त तनपुरे यांची साखर कारखाना आर्थिक घोटाळा प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीने चौकशी केली होती.
ईडीने ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची जवळपास 13.41 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. ईडीने तनपुरे यांच्या दोन जमिनीही जप्त केल्या आहेत. त्या जागांची किंमत जवळपास 7 कोटी 60 लाख एवढी आहे. त्यामुळे अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा तिसरा मंत्री ईडीच्या निशाण्यावर असल्याचे समोर आले आहे.
ED attaches assets worth Rs. 13.41 Crore in illegal auction of Ram Ganesh Gadkari SSK by MSCB causing loss to the bank. Attach assets include 90 acre land of the said SSK and 4.6 acre non agricultural land in Ahmednagar.
— ED (@dir_ed) February 28, 2022
प्राजक्त तनपुरे यांनी महाराष्ट्र स्टेट को – ऑपरेटिव्ह बँक यांच्या लिलावात एक साखर कारखाना अतिशय कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप आहे. ईडीने तनपुरे यांच्या साखर कारखान्याबाबत चौकशी सुरु केली होती. त्यानंतर मागील वर्षी डिसेंबरमध्ये त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. हा तपास सुरु असताना आता ईडीने तनपुरे यांच्यावर पीएमएलएनुसार कारवाई करत मालमत्ता जप्त केली आहे.
2012 साली अहमदनगरच्या राम गणेश गडकरी साखर कारखाना प्राजक्त तनपुरे यांनी विकत घेतला. कारखान्याची 26 कोटी मूळ किंमत होती. मात्र, हा कारखाना तनपुरे यांच्या कंपनीने 12 कोटीत विकत घेतला होता. या कारखान्याला महाराष्ट्र बँकेचं कर्ज होतं. या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळे ईडीने तनपुरे यांना 7 डिसेंबर 2021 रोजी समन्स बजावलं होतं. त्यानंतर त्याच दिवशी तनपुरे यांची 10 तासापेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आली.