पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) आणखी एक झटका दिला आहे. अविनाश भोसले यांची 4 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी ईडीने भोसले यांना समन्स बजावले होते. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी सुरु होती. आता ईडीने 4 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने भोसले यांची शिवाजीनगर येथील गणेशखिंड येथे असलेल्या ऑफिसची मालमत्ता जप्त केली आहे.
ईडीने यापूर्वी भोसले यांच्यासह कुटुंबाची जवळपास 40.34 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. परदेशी चलन नियंत्रण कायदा 1999 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. भोसले यांच्यासह कुटुंबियांनी FEMA चे उल्लंघन करुन फॉरेन सिक्युरिटीज जप्त करण्यात आल्या होत्यात. यामध्ये भारताबाहेर असलेल्या फॉरेन सिक्युरिटीज किंवा स्थावर मालमत्ताही जप्त केली जाऊ शकते.
बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या विरोधात पुणे येथील जमिनीबाबत गुन्हा दाखल आहे. याबाबत ईडीने मनी लॉड्रिंगप्रकरणी तपास सुरु केला. या प्रकरणी ईडीने 11 फेब्रुवारी रोजी भोसले यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापे टाकले. यावेळी भोसले यांचा मुलगा अमित भोसले याला ताब्यात घेऊन चार तास चौकशी केली. या चौकशीनंतर 12 फेब्रुवारीला अविनाश भोसले आणि अमित भोसले यांना चौकशीला बोलावलं होतं. परंतु ते दोघेही हजर झाले नाहीत. यानंतर भोसले यांनी ईडीविरोधात गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यालायात याचिका दाखल केली होती. तसेच 17 फेब्रुवारीला भोसले यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं होतं.