पिंपरी : उद्योजक, राजकीय व्यक्ती असणाऱ्या औंध परिसरातील गणेश नानासाहेब गायकवाड आणि त्यांच्या तीन साथीदारांनी विरोधात पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश नाना गायकवाड, विलास थानमल पालरेषा, सोनाली दीपक गवारे, दीपक गवारे आणि चिमनलाल मिठालाल ओसवाल आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रितम प्रताप खांदवे (वय 39) यांनी तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी लोहगाव परिसरातील खांदवे वस्ती या ठिकाणी राहतात. याच परिसरात त्यांची प्लॉटिंग आहे. रस्त्याच्याकडेला देखील त्यांचे काही प्लॉट आहेत. आरोपींनी आतील भागामध्ये प्लॉट खरेदी केला होता. आरोपींनी संगणमत करून खरेदी दस्तमध्ये चुकीच्या चतुःसीमा टाकून बनावट खरेदी खत तयार केले आणि फिर्यादी यांची फसवणूक केली. चंदन नगर पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश गायकवाड याच्या विरोधात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. या पूर्वी त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा दाखल आहे.