पिंपरी : कारागृहातून सुटल्यानंतर कुख्यात गुंड गजा मारणे याच्या विरोधात यापूर्वी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्यात गजा मारणे आणि त्याच्या दीडशे साथीदारांच्या विरोधात विना परवाना वाहन रॕली काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
गजानन पंढरीनाथ मारणे (रा. कोथरूड, पुणे) आणि त्याचे दीडशे अनोळखी साथीदार, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीस नाईक आबासाहेब कुंडलिक सूळ यांनी बुधवारी (दि. १७) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवना पूल ते चांदणी चौक या दरम्यान बंगलोर मुंबई महामार्गावर तळोजा कारागृहातून सुटलेला आरोपी गजानन मारणे याने आपल्या शंभर ते दीडशे समर्थकांसह 30 ते 35 चार चाकी वाहनांमधून प्रवास केला. या प्रवासादरम्यान समर्थकांनी गाड्यांच्या बाहेर धोकादायक पद्धतीने उभे राहून अर्धवट शरीर बाहेर काढले.
तसेच आजूबाजूने जाणाऱ्या चालकांना कडेला गाड्या थांबविण्यास भाग पाडले. महामार्गावरून जाण्याचा त्यांचा हक्क असतानाही दहशतीच्या जोरावर त्यांना वंचित ठेवले. घोषणाबाजी करून इतर चालकांना पुढे जाऊ न देता शिवीगाळ करून दहशत निर्माण केली.
तसेच पोलिसांनी सर्व वाहन चालकांना थांबण्याचा इशारा केला असता ते निघून गेले. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे करीत आहेत