मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरुन राज्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणावरुन अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या. अशात नवाब मलिकांनी आणखी आरोपांचं सत्र सुरु करत अनेक गंभीर सवाल उपस्थित केले आहे.
नवाब मलिक म्हणाले, सॅम डिसूझा याचा जबाब दिल्लीत नोंदवून घेण्यात आल्याचे कळते आहे. याप्रकरणातील इतरांचे जबाब मुंबईत नोंदवण्यात येत असताना सॅम डिसूझा याचाच जबाब दिल्लीत नोंदवण्याचे कारण काय?, सॅम हा दिल्लीत कुठे होता?, त्याने एनसीबीच्या कोणत्या अधिकाऱ्याला हवालाने पैसे पाठवले?, त्याच्यावरचा गुन्हा मागे घेण्यासाठी कोणते डील झाले?, असा सवाल उपस्थित करत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एनसीबीला द्यावी लागतील, असं मलिक यांनी म्हटलं आहे.
पुढे मलिक म्हणाले, सॅम डिसूझा हा समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीतला माणूस आहे. सर्व नायजेरियन ड्रग्ज पेडलकरकडून हा हप्तेवसुलीचे काम करतो आणि तोच आता एनसीबीच्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी मैदानात उतरला आहे, असा आरोप देखील मलिक यांनी केला आहे. तर, माझी लढाई एनसीबीसोबत नाही तर खोटी प्रकरणे बनवून मुंबईत वसुलीचे रॅकेट चालवणाऱ्या समीर वानखेडे, व्ही. व्ही. सिंग, आशिष रंजन आणि ड्रायव्हर माने नावाचा चालक या चौघांविरुद्ध आहे.