मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. ड्रग्स प्रकरणात त्यांच्या तपासावर, धर्मावरुन विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत असताना आता आणखी एका साक्षीदाराने पलटी मारली आहे. प्रभाकर साईल नतंर खारघर ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार शेखर कांबळे याने कोऱ्या कागदावर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या स्वाक्षरी घेतल्याचा दावा केला आहे.
खारघरमध्ये ड्रग्ज प्रकरणात एका नायजेरियन आरोपीला अटक करण्यात आली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी 10 ते 12 कोऱ्या कागदांवर माझी स्वाक्षरी घेतली. नंतर तेच कागद पंचनाम्यासाठी वापरले, असे शेखर कांबळे यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
शेखर कांबळे यांनी सांगितले, काल टीव्हीवर मी खारघर नायजेरियन प्रकरणाची बातमी बघितली. मला भिती वाटली. अनिल माने आशिष रंजन आणि एनसीबी अधिकाऱ्यांचा मला फोन आला. ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.
काल रात्री उशिरा एनसीबी अधिकारी अनिल माने यांनी मला फोन केला व केणाकडेही याबद्दल वाच्चता करु नको, असे सांगितल्याचे कांबळे यांनी म्हटले. समीर वानखेडे यांनी आपल्याला कोऱ्या कागदावर सही करायला सांगितली होती, असा दावा देखील कांबळे यांनी केला आहे. काहीही होणार नाही, असे वानखेडेंनी आपल्याला आश्वासन दिले. त्याने व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्डही दाखवले.