गुंडा विरोधी पथक जोमात, शहरातील गुन्हेगार कोमात

टोळी प्रमुखाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या टोळीला अटक; एक पिस्तुल, 2 काडतुसे जप्त

0
पिंपरी : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरातील गुंडावर वचक निर्माण करण्यासाठी तयार केलेले गुंडा विरोधी पथक सध्या जोमात आहे. शहरातील गुन्हेगारांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाईचे सत्र सुरु आहे. आकुर्डी परिसरातील रावण टोळी प्रमुखाचा वाढदिवस साजरा करुन प्रतिस्पर्धी टोळीला उत्तर देण्यासाठी जमा झालेल्या सहा जणांना गुंडा विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 1 गावठी पिस्तुल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

 

अनिरुद्ध, विक्की उर्फ बाबा राजू जाधव (24, रा. रावेत), धीरज दीपक जेयस्वाल (26, रा.चिंचवड), रोहन राजेंद्र कांबळे (24, रा. बिजलीनगर, चिंचवड), अमित भगीरथ मल्लाव (26, रा. बीजलीनगर), मंगेश देविदास नाटेकर (22, रा. रावेत) आणि अक्षय लहू चौगुले (23, रा. चिंचवड) या सहा जणांना अटक केली आहे.

 

 

गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील गुंडा विरोधी पथक शहरात गस्त घालत होते. दरम्यान रावण टोळीच्या प्रमुखाच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी सदस्य एकत्र येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार शुभम कदम यांना मिळाली. त्यानुसार गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक हरिष माने आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून सहाजणांना अटक केली आहे.

 

 

मागील वीस दिवसात एकूण 6 गुन्हे दाखल करुन 13 आरोपी अटक केले आहेत. त्यांच्याकडून 5 लोखंडी कोयते, 3 गावठी पिस्तुल, 5 जीवंत काडतुसे असा ऐवज जप्त केला आहे. शहरातील गुन्हेगारांवर गुंडा विरोधी पथकाने वचक ठेवली असून सोशल मीडियावरील ‘चमकू भाईं’वर बारीक लक्ष आहे. गुंडा विरोधी पथकाच्या कारवायांमुळे गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर, पथक प्रमुख हरिष माने, अंमलदार हजरत पठाण, प्रवीण तापकीर, गणेश मेदगे, विजय तेलेवर, रामदास मोहिते, प्रमोद गर्जे शुभम कदम या पथकाने केली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.