गुंडा विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई; तब्बल एक कोटी नऊ लाखाचे दागिने जप्त
सराफ दुकानातील कामगाराला राजस्थानमधून अटक
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुंडा विरोधी पथकाने वेगवेगळ्या कामगिरीने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. शहरातील गुंडावर जरब बसविण्यात यशस्वी झालेल्या या पथकाने एक मोठी कामगिरी केली आहे.
ज्वेलर्सच्या दुकानात हात साफ करणाऱ्या कामगाराला राजस्थान मधून अटक केली. त्याच्याकडून एक कोटी 10 लाख दोन हजार 882 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
मुकेश तिलोकराम सोलंकी (28, रा. मोरेवस्ती, चिखली. मूळ रा. वोपारी, ता. मारवाड जंक्शन, जि. पाली, राजस्थान) याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुकेश हा कृष्णानगर येथील महावीर ज्वेलर्स या दुकानात काम करत होता. दुकानाच्या मालकाने त्याच्याकडे विश्वासाने 1396 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण असलेला बॉक्स आणि 1100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस व राणीहार असलेला बॉक्स सोपवला होता. मालकाचे लक्ष चुकवून मुकेशने मालकाची दुचाकी घेऊन दस-याच्या दिवशी धूम ठोकली.
या प्रकरणाचा तपास चिखली पोलिसांसोबत गुन्हे शाखेकडून देखील सुरु झाला. गुंडा विरोधी पथकाने सुरुवातीला बेंगलोर, हुलीयादुर्ग कर्नाटक येथे जाऊन पाच दिवस राहिलेल्या आरोपीच्या नातेवाईकांकडे तपास केला. त्यानंतर या पथकाने बेंगलोर, कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि राजस्थान असा साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास करून आरोपीला राजस्थान येथून अटक केली.
आरोपीकडून 2305.870 ग्रॅम वजनाचे एक कोटी नऊ लाख 52 हजार 882 रुपयांचे सोन्याचे दागिने, 50 हजारांची एक दुचाकी असा एकूण एक कोटी 10 लाख दोन हजार 882 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, गणेश मेदगे, सुनील चौधरी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, रामदास मोहिते, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी, नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.