खंडणी विरोधी पथकाकडून 102 किलो चंदनाचे लाकडाचे ओंडके जप्त

0

पुणे : हवेली तालुक्यातील पेरणे येथून एका चंदन तस्करी करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मण भिमा गायकवाड  (42, रा. तरडोबाचीवाडी ता. शिरूर) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 102 किलो 400 ग्रॅम चंदनाचे तुकडे आणि एक कार असा एकूण पाच लाख 59 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी गायकवाडविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाच्या युनिट दोनने केली आहे.

याबाबत माहिती अशी, गायकवाड याच्या कारमधून ओल्या चंदनाच्या लाकडाचे तुकडे जप्त करण्यात आले आहे. आरोपी गायकवाड हे कारने चंदन तस्करी करून विक्री व खरेदी करण्यासाठी पुण्यातील नगररोड परिसरात येणार अशी माहिती खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीनूसार खंडणी विरोधी पथकाचे पोलीस नगररोडवर पेंट्रोलींग करीत पेरणे फाटा येथे दाखल झाले. त्यावेळी आरोपी गायकवाड कारने पेरणे येथून भरधाव जात असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पोलिसांनी कारला थांबवण्याचा प्रयत्न केला असता कार न थांबविता तेथून सुसाट सुटली.

त्यानंतर पोलिसांनी संबधित कारचा पाठलाग करुन पेरणेच्या वाळके वस्ती येथील नगररोडवर आरोपी गायकवाडला पकडण्यात आले. त्याला अटक करून त्याच्याकडून 102 किलो 400 ग्रॅम ओलसर चंदनाचे तुकडे व एक कार असा एकूण 5 लाख 59 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, गायकवाडवर यापुर्वी पुणे ग्रामीण पोलिसांच्या मंचर पोलिस ठाण्यात व अहमदनगरच्या पारनेर पोलीस ठाण्यात चंदन तस्करीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डाॅ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अमंलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर. संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, अमोल पिलाने, प्रविण पडवळ, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, मोहन येलपले, रुपाली कर्णवर यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.